जालना : कोरोनामुळे लागलेली संचारबंदी आणि निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत समाजातील दात्यांच्या दातृत्वाचा गरजू कुटुंबांना आधार मिळत आहे. शिवाय रुग्णालयांमधील अपुऱ्या सोयी-सुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठीही अनेकजण पुढाकार घेत आहेत.
रोटरी क्लब, ऑक्सिजन मशीन वाटप
१. कोरोनाच्या प्रादुर्भावात ऑक्सिजन महत्त्वाचे ठरत आहे.
ही बाब ओळखून येथील रोटरी क्लबच्या वतीने जनकल्याण रक्तपेढीला पाच ऑक्सिजन मशिन्स देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे जे रुग्ण घरी उपचार घेत आहेत किंवा कोरोनामुक्त झाल्यानंतर ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता असते अशा रुग्णांना या मशिन्स मोफत वापरासाठी दिल्या जात आहेत. याचा सर्वसामान्यांना लाभ होत आहे.
शमीम मिर्झा, घरपोहोच पाकिटे देतात
२. भोकरदन शहरातील शमीम मिर्झा हे गरजूंना जीवनावश्यक
साहित्याच्या किट्स पुरवित आहेत. गतवर्षी कोरोनात अनेकांनी मदतीचा हात दिला होता; परंतु शहरासह परिसरात सध्या शमीम मिर्झा हे गरजूंना जीवनावश्यक साहित्याची मदत करीत आहेत. त्यांनी जवळपास २५० गरजू कुटुंबांना मदत केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात आणखी गरजू व्यक्तींना मदत करणार असल्याचे शमीम मिर्झा यांनी सांगितले.
मुळे अण्णा फाऊंडेशन, गरजूंना मदत
३. कोरोनामुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अशा कुटुंबांना अण्णा फाऊंडेशनच्या वतीने धान्य किटचे वाटप केले जात आहे. तेल, गहू, तांदूळ, चहापत्ती, साखर, चनाडाळ, मसाला पावडर आदी विविध साहित्यांच्या १५० किटचे वाटप आजवर करण्यात आले आहे. भविष्यात जालन्यासह परिसरातील गाव, शहरातील गरजू कुटुंबांना मदतीचे वाटप केले जाणार असल्याची माहिती रमेश मुळे यांनी दिली.
युवकांचा पुढाकार, पाकिटे वाटप
४. कोरोनामुळे आर्थिक स्थिती हालाखीची झालेल्या कुटुंबांना
मदत करण्यासाठी शहरातील युवकांनी पुढाकार घेतला आहे. शहराच्या विविध भागात राहणाऱ्या नागरिकांना या युवकांनी अन्न पाकिटांचे वाटप केले. या उपक्रमात संकेत नवगिरे, गौरव नवगिरे, अक्षय लोखंडे, आकाश मांटे, सुधीर पवार, बालाजी हंडे, राजेश जुंबड, दिनेश गायकवाड, कुलदीप डोळझाके, शुभम शिंदे, योगेश डोंगरे, प्रतीक वाघमारे व इतरांनी सहभाग घेतला.