रेल्वेप्रवास नको रे बाबा; दररोज १५० ते १७५ तिकिटे होतात रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:26+5:302021-04-23T04:32:26+5:30
जालना : मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. जालना रेल्वे ...
जालना : मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. जालना रेल्वे स्थानकातून दररोज ५०० ते ६०० प्रवासी प्रवास करतात. परंतु, कोरोनाच्या भीतीने दररोज १५० ते १७५ तिकिटे रद्द होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जालना येथील रेल्वे स्थानकातून औरंगाबाद, मुंबई, पुणे, परभणी, नांदेड येथे रेल्वेने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक प्रवाशांनी गजबजलेले असते. परंतु, गतवर्षापासून देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने प्रवाशांची संख्या कमालीची घटली आहे. शिवाय रेल्वे प्रशासनाकडूनही बहुतांश रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने आता प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दररोज १५० ते १७५ प्रवासी आरक्षण रद्द करीत आहेत.
मुंबई, पुण्याची गर्दी ओसरली
जालना रेल्वे स्थानकातून मुंबई, पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, वाढत्या कोरोनामुळे लोक प्रवास करणे टाळत आहेत. शिवाय मुंबई, पुणे येथे कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लोक मुंबई, पुण्याला जाणे टाळत आहेत.
जालना रेल्वे स्थानकातून दररोज ५०० ते ६०० लोक प्रवास करतात. परंतु, मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. दररोज १५० ते १७५ जण आरक्षण रद्द करीत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.