दुष्काळी स्थितीतही चौदा गावे पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:45 AM2019-01-26T00:45:37+5:302019-01-26T00:45:57+5:30
भोकरदन तालुक्यातील चौदा गावांमध्ये दुष्काळातही या गावांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे
फकिरा देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. असे असतांनाही भोकरदन तालुक्यातील चौदा गावांमध्ये दुष्काळातही या गावांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, येथील जलसाठ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होत असल्याने याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
भोकरदन तालुक्यात १५७ गावे आहेत. त्यापैकी जानेवारीत ४० गावांना ७० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच दहा गावांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर ८६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असतानाच तालुक्यातीलच चौदा गावांना मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे.
बाणेगाव, पळसखेडा, दाभाडी, पळसखेडा ठोंबरी, पद्मावती, दानापूर, चांदई एक्को, शेलूद, लेहा, खंडाळा, पारध खुर्द, पारध बु, वाढोणा या चौदा गावांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असून, येणारे काही दिवस तरी पाणीटंचाई भासणार नसल्याचे चित्र आहे. परंतु, सध्या पद्मावती व बाणेगाव यातील मध्यम प्रकल्पातून पाणी चोरी होत असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.