जालना: उन्हाळ्यात पक्षांना पाणी आणि अन्नासाठी भटकंती करावी लागते. अनेकदा त्यांना पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होतो. अन्न आणि पाण्याअभावी पक्षांचा मृत्यू होऊ नये म्हणून जालना शहरतील चंदनझिरा परिसरातील जीवनराव पारे विद्यालयातील मुला-मुलींनी पक्षांसाठी घरट बांधून त्यात अन्न पाण्याचीही सोय केली आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे.
जीवनराव पारे विद्यालयाच्या परिसरात विविध प्रकारचे झाडे आहेत. या वृक्षांवर बुलबुल, मैना, पारवा, कबुतर, राघू, चिमण्या नेहमी येता असतात. शाळा सुरू असल्यावर त्यांना अन्न व पाणी मिळते. परंतु, उन्हाळ्यात शाळा बंद असल्यावर त्यांना ते मिळत नाही. म्हणून त्यांच्यासाठी पाणी व अन्नाची सोय व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आकर्षक घरटे या पक्षांसाठी तयार केले. या घरट्यात पाणी टिकुन राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक भांडे तयार केले आहे. हे घरटे झाडावर बांधुन त्यामध्ये पाणी व अन्नाची सोय केली आहे. झाडावर बांधलेल्या या घरट्यात सध्या रोज पाणी टाकले जाते. या उपक्रमामुळे आता शाळा परिसरात सतत पक्षांची किलबिलाट ऐकायला मिळत आहे. या उपक्रमात आरती धोत्रे, अपेक्षा साळवे, राणी चव्हाण, शितल भानुसे, निकिता ढेंम्पे, निता गायकवाड, अश्विनी किल्लेदार, ओम पैठणकर, आदित्य साळवे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सुंदर व आकर्षक असे घरटे तयार केले. त्यांच्या सृजनशिलतेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी कौतुक केले आहे.
आमच्या शाळेच्या प्रांगणात भरपूर झाडे आहेत. त्यामुळे आम्हाला शाळेत प्रसन्न वाटते. शाळेत विविध पक्षी नेहमी येतांना दिसतात. त्यांचा आवाज ऐकायला आवडते. उन्हाळ्यात या पक्षांना अन्न व पाणी मिळणार नाही म्हणून या पक्षांना खायला व पाणी प्यायला मिळावे यासाठी आम्ही पक्षांसाठी सुंदर घरटे तयार केले.- आरती धोत्रे, विद्यार्थीनी
आम्ही आमच्या शाळेत दरवर्षी उन्हाळ्यात पक्षासाठी पाणी व अन्न याची सोय करतो. यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून घरटे तयार घेतली. प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात पक्षांसाठी अशी सोय केली पाहिजे.- सुभाष पारे, मुख्याध्यापक