जालना जिल्ह्यात सिंचन, पाणीपुरवठ्याची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:08 AM2018-02-02T00:08:41+5:302018-02-02T10:48:58+5:30
उन्हाळा तोंडावर आला असताना जिल्ह्यातील अनेक गावांमधील पेयजल योजनेची कामे ठप्प आहेत. सिंचन आणि बांधकाम विभागाच्या अनेक कामांना ब्रे्रक लागला आहे. या तिन्ही विभागांत अधिकारी व कर्मचा-यांची एकूण ५७ पदे रिक्त आहेत.
रिक्त पदांचे ग्रहण-भाग-३
बाबासाहेब म्हस्के/जालना : उन्हाळा तोंडावर आला असताना जिल्ह्यातील अनेक गावांमधील पेयजल योजनेची कामे ठप्प आहेत. सिंचन आणि बांधकाम विभागाच्या अनेक कामांना ब्रे्रक लागला आहे. या तिन्ही विभागांत अधिकारी व कर्मचा-यांची एकूण ५७ पदे रिक्त आहेत.
जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या महिन्यात जिल्ह्यातील अनेक गावे व वाड्या वस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण होते. यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २२ कोटी ४८ लाखांचा टंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे. टंचाई आराखडा तयार केला असला तरी अनेक गावांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेसह, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची कामे अनेक वर्षांपासून पूर्ण झालेली नाहीत. मुख्यमंत्री पेयजल योजनेची कामे निविदा प्रक्रियेत अडकली आहेत. सिंचन विभागामार्फत केल्या जाणा-या जलसंधारणाच्या कामांनाही रिक्त पदांमुळे ब्रेक लागला आहे. या विभागाच्या माध्यमातून केली जाणारी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर सिमेंट नाला बांध व अन्य कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. अपूर्ण कर्मचा-यांमुळे या विभागाकडून जलसंधारणाच्या कामांची माहिती वेळेत पाठवल्या जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियंता, आरेखक इ. पदे रिक्त असल्याने सिंचन, बांधकाम व पाणीपुरवठा विभागाच्या कामांवर परिणाम झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. विशिष्ट जबाबदारी असणा-या अनेक तांत्रिक अधिकारी व कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने, ही कामे तात्पुरती इतर अधिकायांकडून करून घेतली जात आहेत. त्यामुळे कामांच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
---------------
सिंचन, बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांशी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांच्या ६६ पदांपैकी आठ, स्थापत्य अभियंता सहायकांची ६१ पैकी २७, आरेखक, तारतंत्री, संगणक, जोडारी ही पदे रिक्त असून, तिन्ही विभागांत पदोन्नतीने भरावयाची १३ पदे रिक्त आहेत. याच विभागांचा उपविभाग असलेल्या यांत्रिक विभागातही वायू संपि.चालकाची तीन, जॅक ड्रीलरचे एक व कनिष्ठ अभियंताचे एक पद रिक्त आहे.
-------------