लाेकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात गतवर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. असे असतानाही २८४ मुली सैराट झाल्या आहेत. यात विशेष म्हणजे, महिलांचाही समावेश आहे. यातील केवळ ७९ मुली घरी परतल्या असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.
देशासह राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. दुसरीकडे मात्र याच काळात सर्वाधिक मुली पळून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील तीन वर्षांचा विचार केला असता, जिल्ह्यातून कोरोना काळात मुली पळून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. गतवर्षात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये २८४ गुन्हे दाखल आहेत. १८ वर्षांखालील मुलगी पळून गेली असेल, हरवलेली असेल तर, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. १८ वर्षांच्या पुढील मुली अथवा महिलेच्या गुन्ह्यात मिसिंग दाखल करण्यात येते. बहुतांश प्रकरणांत मुली किंवा महिला या त्यांच्या मर्जीने प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने किंवा सोबत राहण्यासाठी फरार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अनेक प्रकरणांत सहमतीने पळून गेल्यामुळे या प्रकरणात १८ वर्षे पूर्ण नसले तर त्या मुला-मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात येते. दरम्यान, अनेक जण अल्पवयीन असताना फरार झाले असतील तर, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वत:हून पोलीस ठाण्यातदेखील हजर झालेले आहेत. पोलीस प्रशासनाकडून सातत्याने त्यांचा शोध घेतला जातो. त्यामुळे वर्षाअखेर जेवढे गुन्हे दाखल झालेले असतात. त्यापैकी बहुतांश गुन्हे निकाली निघतात. पोलीस विभागाकडून मुलींचा शोध घेतल्या जात आहे.
९० मुलेही बेपत्ता
जिल्ह्यातून तब्बल १११ मुले पळून गेले होते. त्यापैकी २१ मुले मिळून आले आहेत, तर अद्यापही ९० मुलांचा पोलिसांना शोध लागला नाही. पोलीस या मुलांचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
२०५ मुलींचा शोध लागेना
जालना जिल्ह्यात मागील वर्षात तब्बल २८४ मुली पळून गेल्या आहेत. त्यातील ७९ मुली मिळून आल्या आहेत. अद्यापही २०५ मुलींचा शोध लागला नाही.
मागील काही दिवसांपासून महाविद्यालयातील मुले-मुली पळून जात आहेत. हा चिंतेचा विषय आहे. हे प्रकार टाळण्यासाठी पालकांनीदेखील तेवढेच सतर्क राहून पाल्यावर लक्ष दिले पाहिजे. आम्ही पळून गेलेल्या मुलींचा शोध घेत आहोत.
- सुभाष भुजंग, पोनि. स्थानिक गुन्हे शाखा.