जीएसटी विभागाचे राज्य कर सहआयुक्त आनंद पाटील, राज्य कर उपायुक्त रवींद्र जोगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही ई-वेबिल तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आधीदेखील याच विभागाने ही ई-वेबिलची तपासणी करून जवळपास १५ हजार वाहनांकडून ६५ लाख रुपयांचा दंड वसूल केला होता.
दरम्यान, याआधी सूचना देऊनही अनेक व्यापारी, उद्योजक हे ई-वेबिल संदर्भातील पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आनंद पाटील यांनी ही मोहीम आता नियमितपणे आणि २४ तास राबविण्याचे निर्देश दिले ओहत. त्यानुसार जालन्यात चार अधिकारी आणि १२ निरीक्षकांची दोन पथके कार्यरत आहेत. जालना-औरंगाबाद मार्गवर दिवस-रात्र ही तपासणी करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत दहा लाख रुपयांपेक्षा अधिकचा कर वसूल करण्यात असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई करण्यासाठी सहायक कर उपायुक्त मकरंद कंकाळ, धनंजय देशमुख, माधव कुरशेडवाड, तुषार गावडे हे तळ ठोकून आहेत. या कारवाईने येथील उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. पंधरा दिवंसापूर्वीच बिलांमधील त्रुटींचे कारण दाखवत जीएसटीच्या भरारी पथकाने स्टील उद्योजकांवर कारवाई केली होती.