आई-वडील होणे सोपे; पण पालक होणे अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:37 AM2019-02-25T00:37:29+5:302019-02-25T00:37:57+5:30
बोटावर मोजण्याइतकीच लोक पालक झाले आहेत. त्यांचे मुल चांगल्या मार्गाला लागले असून आईने मुलींना वेळ दिला पाहिजे, असे मत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : आपण आई-वडील होत आहोत. पण, पालक होत नाही. पालक होणे फार महत्त्वाचे आहे. बोटावर मोजण्याइतकीच लोक पालक झाले आहेत. त्यांचे मुल चांगल्या मार्गाला लागले असून आईने मुलींना वेळ दिला पाहिजे, असे मत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे.
येथील पंडित गोविंदराव जळगांवकर नाट्यगृहात आयोजीत यशवंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावी फाउंडेशन, अकलूज च्या अध्यक्षा सविता व्होरा होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून वैशाली खरात, अनुराधा राख, कृषीभुषण विजयअण्णा बोराडे, जीएसटी उपायुक्त प्रशांत गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या व्याख्यानमालेत ‘कृषिउद्योग आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावर पवार बोलत होत्या.
दरम्यान सुनंदा पवार यांनी महिलांनी आपल्या जवाबदाऱ्या संभाळत असताना तरुण मुला- मुलींकडे कसे लक्ष दिले पाहिजे याचाही सल्ला दिला. त्या म्हणाल्या, आजची स्त्री का जिजाऊ होऊ शकत नाही. मुलांचा मुलींचा होणारा बदल हा फार घातक असून वेळेवरच याला अवर घातला नाही तर आपल्या हातात फक्त पश्चाताप शिवाय काहीच रहाणार नाही. त्यासाठी प्रत्येक स्त्रिला जिजाऊ बनावे लागेल, एक संस्कार क्षम पिढी ही काळाजी गरज आहे.
ग्रामीण भागातील नागरिक खुश आहेत का ?
सन २०२० साली भारत महासत्ता होणार हे स्वप्न माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांचे होते. याला फक्त १ वर्ष बाकी आहे. मातीचे घर गेले सिमेंटचे घर आले, कच्चे रस्ते गेले. चांगले रस्ते आले. चार चाकी आली. मात्र ग्रामीण भागातील लोकांची मानसिकत्ता बदलली आहे का? सर्व नागरिक खुश आहे का? हे सर्व झाले तरच देश महासत्ता बनेल. हे सर्व करीत असताना प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य, अधिकार ओळखूनच वागले पाहिजे, असेही सुनंदा पवार यांनी सांगितले.