लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काही दिवसांवर खरीप हंगाम आला आहे. मृग नक्षत्रास उद्यापासून सुरूवात होत आहे. यामुळे अनेक शेतकरी बी-बियाणे खरेदीच्या तयारीला लागले आहेत. याच संधीचा फायदा घेत अनेक बी-बियाणे विक्रेते शेतकऱ्यांना बोगस (वांझ) बियाणांची विक्री करू शकतात, यामुळे या बोगस (वांझ) बियाणांना आळा घालण्यासाठी कृषी विभागातर्फे जिल्ह्यात ८ पथके तयार करण्यात आली आहेत.गेल्या दोन- तीन वर्षांपासून बळीराजा मोठ्या हिमतीने खरिप व रब्बी हंगामाची पेरणी करित आहे. मात्र, सतत दुष्काळ पडत असल्याने पिकांचा पाळापाचोळा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी दरवर्षी निराषाच पडत आहे.यंदाही वरूनराज चांगला बरसेल आणि पिक जोमाने येईल, या आशेनं बळीराजा खरिप हंगामाच्या तयारीला लागल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे. १ जूनपासून बीड, हिंगोळी, परभणी, जालना आदी जिल्ह्यामध्ये पावसाचा शिडकाव होण्याला सुरूवात झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतक-यांची बि- बियाणांच्या खरेदीची लगबग सुरू आहे. परंतु, अनेकदा शेतक-यांना विविध प्रकारची लालस (प्रलोभने) दाखवून बोगस बियाणांची विक्री विक्रेत्यांकडून केली जावू शकते, यामुळे यंदा कृषी विभाग सतर्क झाला असून तालुकास्तरीय सात व जिल्हास्तरीय एक अशी आठ पथके तयार करण्यात आली आहेत.या एका पथकात ४ अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. या पथकाला बोगस बियाणांची विक्री होत असल्याची माहिती प्राप्त होताच पथकातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी जावून या बाबींची खात्री करणार आहेत.यात जर कोणी दोषी आढळून आला तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.अशी होते बियाणांची विक्री : बोगस बियाणे अनेकदा कृषी सेवा केंद्रामार्फत चोरून विकल्या जातात. खरेदीदारला बियाणे खरेदी केल्याची पावती दिली जात नाही. चांगले व दर्जेदार बियाणे आहे. हेच बियाणे आमच्या विश्वासावर खरेदी करा, असे बियाणे विक्रेते सांगून कमी- जास्त पैशांमध्ये बियाणांची विक्री करतात. तसेच अनेकदा बियाणांना कलर देवून आकर्षीत पॅक बनवून बोगस कंपण्यांची नावे टाकून बियाणांची विक्री केली जाते.
बोगस बियाणांना आळा घालण्यासाठी आठ पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 12:50 AM