लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील गायरान जमीन आदिवासींच्या नावे करावी या व अन्य मागण्यासांठी सोमवारी एकलव्य ब्रिगेड सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.अंबड चौफुली येथून दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. आदिवसींच्या पारंपरिक वेशभूषेत मोर्चात सहभागी युवकांनी लक्ष वेधून घेतले. अंबड चौफुलीमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. त्यांनतर मोर्चेकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.निवासी जिल्हाधिका-यांनी निवेदन स्वीकारले. आदिसावी शबरी आर्थिक महामंडळ कायम ठेवून प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची स्थापना करावी, आदिवसींना जात प्रमाणपत्राचे वाटप करावे, आदिवासी समाजातील जातप्रमाणपत्र काढण्यासाठी खासरा पाहणी पत्राची अट रद्द करावी, आदिवासींना दारिद्र्य रेषेत समाविष्ट करावे, आदिवासी वाड्या, वस्त्यांवर स्वतंत्र स्मशानभूमी द्यावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंकुश वेताळ, मराठवाडा अध्यक्ष प्रल्हाद दळवी, जिल्हाध्यक्ष नितेश बर्डे, तालुकाध्यक्ष कृष्णा गायकवाड आदींच्या स्वाक्ष-याआहेत.
आदिवासींच्या मागण्यांसाठी एकलव्य संघटनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:05 AM