विद्युत तारा घासल्याने लागली उसाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:13 AM2019-03-27T00:13:25+5:302019-03-27T00:13:45+5:30
शेतावरून गेलेल्या विद्युत तारा एकमेकाला घासून उडालेल्या ठिणग्यामुळे उसाच्या शेताला आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : शेतावरून गेलेल्या विद्युत तारा एकमेकाला घासून उडालेल्या ठिणग्यामुळे उसाच्या शेताला आग लागली. या आगीत दीड एकर ऊसाचा जळून कोळसा झाला आहे.
टेंभुर्णी येथील शेतकरी अरुण राधाकिसन खरात यांचे गणेशपूर शिवारात शेत आहे. त्यांनी आपल्या शेतातील दिड एकर ऊस तसेच रसवंतीसह जनावरांसाठी चारा म्हणून संभाळून ठेवला होता.
दरम्यान, सोमवारी विद्युत तारा घासून झालेल्या घर्षणाने या उसाला आग लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने या आगीने क्षणात रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण उसाचा जळून कोळसा झाला. यात खरात यांचे जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी त्वरित धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, ऐन दुष्काळात मोठी आर्थिक झळ बसलेल्या या शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
या परिसरातील शेतावरून अकोला देव सबस्टेशनला गेलेल्या विजेच्या विद्युत तारा गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे सहज खालून हात पुरेल अशा या तारा खाली लोंबकळल्या आहेत. यातून नेहमीच स्पार्किंग होत असते. यामुळे परिसरातील शेतक-यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या तारांच्या दुरूस्तीबाबत वेळोवेळी महावितरणाला सांगितले पण ते दुर्लक्ष करीत आहे. यामुळे जीवित हानी होण्याचा धोका आहे.
- शिवहरी खरात, शेतकरी