दरवर्षी घटतेय जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 12:18 AM2018-11-08T00:18:11+5:302018-11-08T00:18:31+5:30
: जिल्ह्यात इंग्रजी तसेच खासगी शाळांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या पटसंख्येत घट होत आहे. जालना जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात इंग्रजी तसेच खासगी शाळांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या पटसंख्येत घट होत आहे. जालना जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे. सन २०१७-१८ मध्ये ७ हजारांनी पटसंख्येत घट झाल्याचे समोर आले.
विद्यार्थ्यांचा खासगी व इंग्रजी माध्यमातील शाळांकडे वाढता कल, शिक्षणक्षेत्रात वेगाने होत असलेले बदल, यामुळे जि. प. शाळांना घरघर लागली आहे. अनेक विद्यार्थी हे खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळत असले तरी याकडे मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांची संख्याही कमी नाही. ग्रामीण भागामध्ये शेती करणाऱ्यांची संख्या प्रत्येकवर्षी कमी होत चालली आहे. कारण निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतक-यांचे दरवषी उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे नोकरीनिमित्ताने शहरी भागाकडे प्रमाणही जास्त आहे. या सर्वांचा परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर होत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक हे शाळा बाह्य विद्यार्थ्यांचा व स्थंलातरी विद्यार्थ्याचा शोध घेत असतात. चिरेखाणीवरील कामगारांची मुले तसेच रस्ता कामगारांच्या मुलांना शाळेत आणण्यासाठी त्यांच्या पालकांचे शिक्षकांकडून प्रबोधन करण्यात येते. तरीही विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत नाही. सन १०१५-१६ मध्ये जि.प.च्या शाळेत १ लाख ७६ हजार २८० विद्यार्थ्यांची संख्या होती. २०१६-१७ मध्ये १ लाख ७१ हजार ४१६ झाली.
४ हजार ८६४ ने पटसंख्येत घट झाली. तर वर्ष १७-१८ मध्ये १ लाख ६४ हजार ३८१ झाली. यात ७ हजार ३५ विद्यार्थी कमी झाले आहे. त्यामुळे येणाºया काळात जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंर्दभात जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिका-यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
घटत्या पटसंख्येमुळे शिक्षक चिंतेत
मागील वर्षी तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. यामुळे शिक्षक वर्गामधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
शाळा बंद पडण्याची भीती
जिल्ह्यात १५४५ शाळा आहे. परंतु, दिवसेंदिवस पटसंख्येत घट होत असल्याने जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
पटसंख्येबाबत राज्य सरकारतर्फे उपाय योजना करण्यात येत आहे. परंतु, स्थानिक पातळीवर उपाय योजना होतांना दिसत नाही. त्यामुळे शिक्षणाधिका-यांनी लक्ष देण्याची गरज आहेत.