तीर्थपुरी (जालना) : घनसावंगी तालुक्यातील दहिगव्हाण येथील शेतकरी पांडुरंग आंबादास धुराफोडे (२६) यांनी सततच्या नापिकीला कंटाळून बुधवारी पहाटे गळफास घेवून आत्महत्या केली.
मयत पांडुरंग धुराफोडे यांना दोन ते तीन एकर जमीन असून, त्यांच्यावर एका बँकेचे कर्ज आहे. मात्र, जमिनीतून उत्पन्न अल्पसे मिळत होते. यातून घरखर्च भागत नसल्याने त्यांनी तीर्थपुरी येथील साखर कारखान्यावर ऊस तोडणीचे काम सुरू केले होते. मंगळवारी पहाटे पांडुरंग यांनी उसाची पहिली टायर गाडी कारखान्यावर नेऊन घातली. घरी आल्यानंतर ते मध्यरात्री घराबाहेर निघून गेले. नातेवाईकांनी शोधाशोध केली असता त्यांनी स्वत:च्या शेतात गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मयत धुरफोडे यांच्या पश्चात आई- वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.