जालना : जिल्हा परिषदेमध्ये सिंचन विहिरींच्या मुद्यावरुन परतूर तालुक्यातील खांडवी व अन्य गावातील जवळपास २०० शेतकरी आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात घुसले. सभागृहात ठिय्या मांडत त्यांनी प्रशासनाविरुध्द जोरदार घोषणाबाजी केल्याने मोठा गोंधळ उडाला.
आज जिल्हा परिषदेत स्थायी समितीची सभा होती. ही सभा सुरु होण्यापूर्वीच सर्व शेतकरी सभागृहात घुसले. त्यांनी मोठा गोंधळ केला. यावेळी भाजपचे जि.प. सदस्य राहुल लोणीकर आणि जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. या गोंधळामुळे स्थायी समितीची सभा तहकूब करण्याची घोषणा केली अध्यक्ष खोतकर यांनी केली. याच गोंधळात धामणगाव तालुका बदनापूर येथील शेतकऱ्याचा मावेज न मिळाल्याने सभागृहातील सीईओंची खुर्ची जप्त करण्यात आली.