शेतकऱ्यांना मिळणा-या दुष्काळी अनुदानाला आॅनलाईनचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:39 AM2019-05-08T00:39:59+5:302019-05-08T00:40:27+5:30
चार महिन्याच्या विलंबानंतर शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, बँकेचे सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने शेतक-यांना दिवसभर बँकेत ताटकळत बसावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात यंदा कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना दुष्काळात आधार मिळावा म्हणून शासनाने दुष्काळी मदत जाहीर केली. चार महिन्याच्या विलंबानंतर शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, बँकेचे सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने शेतक-यांना दिवसभर बँकेत ताटकळत बसावे लागत आहे.
चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दुष्काळी अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यात करण्यात आली आहे. यामुळे रक्कम काढण्यासाठी सर्व व्यवसाय सोडून बँकेत गर्दी करत आहेत. बहुतांशी शेतक-यांना दिवसभर बँकेच्या दारात बसून देखील रक्कम मिळत नसल्याने माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे शेतक-यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पारध परिसरात यंदा निसर्गाने हात दाखविल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना दुष्काळात आर्थिक आधार देण्यासाठी दुष्काळी मदत जाहीर केली. याच अनुषंगाने पारध येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत सात गावातील शेतक-यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले. आता ही रक्कम मिळावी म्हणून शेतकरी बँकेच्या दारात भर उन्हात गर्दी करु लागले आहेत. आॅनलाईन सेवा विस्कळीत होत असल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत. याकडे बँकेच्या कर्मचारी देखील कानाडोळा करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे हाताला काम नसल्याने शेतक-यांना मोठी आर्थिक चणचण भासत आहे. परिवाराचा दैनंदिन खर्च कसा भागवावा, या विवंचनेत सध्या शेतकरी आहेत.
दैनंदिन खर्च व खरिपाची पेरणी देखील तोंडावर आली असल्याने पेरणीसाठी आपल्याला या शासनाच्या पैशाची मदत होईल, म्हणून शेतकरी रोज बँकेत चकरा मारत आहेत. त्यातच उन्हाचा वाढलेला पारा व बँकेत सुविधाचा अभाव या गोष्टी झेलत शेतकरी वर्ग,विशेषत: वृद्ध महिला शेतकरी हे तासतांस बँकेच्या दारात अनुदानासाठी ताठकळत उभे राहत असल्याचे चित्र जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिसत आहे.
विशेष म्हणजे बँकेने दुष्काळ अनुदान वाटपाचे गावनिहाय नियोजन करुन देखील बँकेत शेतक-यांची गर्दी वाढत आहे. बँकेच्या कर्मचा-यांचा गलथान कारभारामुळेच शेतक-यांची गैरसोय होत आहे. बँकेला आॅनलाईन सेवा पुरविण्यासाठी बीएसएनएलकडून सेवा घेत आहे. मात्र, वारंवार सेवा विस्कळीत होत असल्याने शेतक-यांसह ग्राहकांची गैरसोय होत आहे. याकडे बँकेच्या व्यवस्थापकांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.