लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यात स्टील उद्योगाची मुहूर्तमेढ महेंद्र रि रोलिंग मिल या नावाने रोवणाऱ्या शांतीलाल पित्ती यांना स्टीलचे पितामह म्हणून ओळखले जात होते. त्यांचे गुरूवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी अवघ्या दोन लाख रूपयांच्या गुंतवणुकीवर सुरू केलेला एसआरजे स्टील उद्योग समूहाने गेल्या ४८ वर्षात एक हजार कोटी रूपयांच्या उलाढालीपर्यंत मजल मारली आहे.शांतीलाल पित्ती यांचे वडील गोवर्धनदास पित्ती हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जालन्यात वास्तव्यास होते. पूर्वी पित्ती परिवाराचा जालना ट्रान्सपोर्ट या नावाने वाहतूकीचा व्यवसाय होता. त्यावेळी त्यांचेकडे १६ ट्रक होते. शांतीलाल पित्ती यांचे शिक्षण बी. कॉम. पर्यंत झाले होते. १९७१ मध्ये रोटी, कपडा और मकान या त्रिसुत्रीला स्टील उद्योगात त्यांनी लक्ष घातले. तेव्हापासून आजपर्यंत या उद्योगास ते आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी वेगवेगळे तंत्रज्ञान आणून उद्योगाचा विकास केला. १९८४ मध्ये एसआरजे या नावाने उद्योग उभारला. यामध्ये पूर्वी कार्बन, मॅगनीज, फॉस्फरसचा वापर करून स्टीलची निर्मीती केली जात होती. परंतु, नंतर मोठा मुलगा सुरेंद्र याचे मेट्रलजी इंजिनिअरींग पूर्ण करून त्यांनी तसेच अन्य दोन भाऊ रवींद्र आणि जितेंद्र यांनी या व्यवसायाची जवाबदारी सांभाळली. त्यांनी या स्टील कारखान्यात आणखी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणून पूर्वी कोळशावर चालणारी थर्मेस कोलकत्ता येथून ८५ लाख रूपये खर्च करून आणली. तेव्हापासून एसआरजे स्टीलच्या उत्पादन आणि दर्जात लक्षणीय वाढ झाली. मध्यंतरी कामगारांनी मोठा संप केल्यानंतर आमचा उद्योग अडचणीतही सापडला होता. परंतु, सर्वांच्या मदतीने यात तोडगा काढून स्टील उद्योग चालूच ठेवला. १९९२ मध्ये पुन्हा फर्नेस मध्ये बदल करून फ्रान्स येथून ५० मे. टन उत्पादन करणारी ही भट्टी एसआरजे स्टीलमध्ये कार्यान्वित करण्यात आली. १९९५ मध्ये याच तीन भावांनी श्री ओम रोलिंग मिलची स्थापना केली. दररोज ५० मे. टन उत्पादनातून आमच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल ४०० कोटी रूपयांवर पोहोचली होती. ती आज एक हजार कोटी रूपयांच्या घरात पोहचली त्यासाठी शांतीलाल पित्ती यांची दूरदृष्टी महत्वाची होती. एकूणच जालना जिल्ह्यातील उद्यमशिलतेला चालना देण्यासाठी या परिवाराचा आणि विशेष करून शांतीलाल पित्ती यांचा यात सिहांचा वाटा होता.स्टील उत्पादनात ज्या प्रमाणे पित्ती परिवाराने जालन्यात श्री गणेशा केला होता. त्याच धर्तीवर मराठवाड्यात प्रथम बिस्कीटचे उत्पादन करणारा दिव्या एसआरजे ही कंपनी जालना-रामनगर मार्गावर २५ कोटी रूपयांची गुंतवणूक करून उभारली आहे. या बिस्कीट कंपनीमध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नामांकीत ब्रॅण्डचे उत्पादन केले जाते.
स्टील उद्योगाचे पितामह पित्ती कालवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:40 AM