कोरोनाच्या प्रादुर्भावाने कुटुंब शेतात गेले; दरोडेखोरांनी संधी साधत मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:50 PM2021-04-26T13:50:34+5:302021-04-26T13:52:41+5:30
Crime News मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भालगाव येथील मच्छिंद्र म्हस्के हे आपल्या कुटुंबासह शेतात राहण्यासाठी गेले होते.
अंबड (जि.जालना) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतात राहण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला दरोडेखोरांनी जबर मारहाण करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ८१,५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना अंबड तालुक्यातील भालगाव येथे सोमवारी सकाळी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भालगाव येथील मच्छिंद्र म्हस्के हे आपल्या कुटुंबासह शेतात राहण्यासाठी गेले होते. रविवारी रात्री ते आपल्या कुटुंबासोबत पत्राच्या शेडमध्ये झोपलेले होते. अडीच वाजण्याच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी घराचा दरवाजा वाजविला. मच्छिंद्र म्हस्के यांनी दरवाजा उघडताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर दररोडेखोरांनी शेजारच्यांसह म्हस्के कुटुंबालाही मारहाण केली. यात एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर अंबड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व मोबाईल असा ८१,५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.
पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोनि. हुंबे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी सकाळी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोनि. भुजंग यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी चार मोबाईल सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.