दिवसाकाठी ३०० वर बालकांना ज्वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:01 AM2019-09-22T00:01:29+5:302019-09-22T00:01:41+5:30
बदलत्या वातावरणामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बदलत्या वातावरणामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात दैनंदिन २५० ते ३५० बालकांवर उपचार केले जात असून, अंतररूग्ण विभागातही २५ ते ३० बालके उपचारासाठी दाखल होत आहेत. विशेषत: तापाचे रूग्ण वाढले असून, खाजगी रूग्णालयेही फुल्ल होत आहेत. तापामुळे बालकांच्या प्लेटलेटवरही परिणाम होताना दिसत आहे.
वातावरणातील बदलांमुळे गत काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकल्यासह इतर आजारांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: ताप अधिक असल्याने डेंग्यूसदृश आजाराप्रमाणे प्लेटलेट कमी होण्याचे प्रमाण दिसून येत आहे. लहान बालकांना अचानक ताप येत असल्याने जिल्हा रूग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील बालरूग्ण उपचारासाठी येत आहेत. जिल्हा रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात दैनंदिन उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या २५० ते ३०० वर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अंतररूग्ण विभागात उपचारासाठी दैनंदिन साधारणत: २० ते २५ बालके दाखल होत आहेत. शहरातील खाजगी रूग्णालयात अॅडमिट होणाºया बाल रूग्णांची संख्याही मोठी आहे.
बदलते वातावरण, डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ पाणी यासह इतर कारणांमुळे बाल रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एखाद्या बालकाच्या शरीरात अधिक काळ ताप राहिली तर डेंग्यूसह इतर आजाराची शक्यता असते. त्यामुळे बालके आजारी पडल्यानंतर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोरडा दिवस पाळणे, हात स्वच्छ धुणे, शारीरिक स्वच्छता, पौष्टिक अन्न खाणे, आहारात फळांचा, ताज्या भाज्या वाढविणे गरजेचे असल्याचे जिल्हा रूग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा रूग्णालयात डेंग्यूसारख्या आजाराचे रूग्ण आढळून आलेले नाहीत. मुलांना तापासह इतर आजार असतील तर तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरासह ग्रामीण भागात मच्छराचे प्रमाण वाढलेले आहे. बदलते वातावरण आणि मच्छरांमुळे बालकांसह वयोवृध्दही आजारी पडू लागले आहेत. विशेषत: बालकांना ताप, सर्दी, खोकला आदी आजार जडत आहेत. शासकीय रूग्णालयासह खाजगी रूग्णालयात रूग्णांची मोठी गर्दी होत आहे. या आजाराची लागण होऊ नये, यासाठी पालकांनी आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे. विशेषत: प्रत्येक आठवड्याला कोरडा दिवस पाळणे, घरासह परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, मुलांचे वेळोवेळी हात धुणे, त्यांच्या शारीरिक तपासणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.