डॉक्टरांच्या रिक्त जागा भरणार; ३०० इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 12:47 AM2019-12-08T00:47:48+5:302019-12-08T00:48:21+5:30
शनिवारी वैद्यकीय पदासाठीच्या इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात होती. ही रिक्त पदे भरण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने हलचाली सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गत शनिवारी वैद्यकीय पदासाठीच्या इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली.
शनिवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात २०० ते २५० डॉक्टरांची गर्दी असल्याने नेमके काय सुरू आहे, हे सामान्यांना कळाले नाही. परंतु, अधिक चौकशी केली असता हे सर्व डॉक्टर आपली कागदपत्रे घेऊन त्याची खातरजमा आणि छाननी करण्यासाठी येथे आल्याचे सांगण्यात आले. कंत्राटी तत्त्वावर ही पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना एक वर्षाच्या करारावर नियुक्ती देण्यात येणार असून, यासाठी त्यांना मानधन म्हणून ५५ हजार रूपये तर बीएएमएस डॉक्टरांसाठी हेच मानधन ४५ हजार रूपये राहणार आहे. प्रथम एमबीबीएस पदवी घेतलेल्या डॉक्टरांना नियुक्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर बीएएमएसचा विचार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.
शनिवारी ज्या उमेदवारांची कागदपत्रे वैध आहेत, अशांना ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखत आणि रुजू होण्यासाठी सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत केली जात आहे. याचे सदस्य सचिव जिल्हा शल्यचिकित्सक मधुकर राठोड हे असून, सदस्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह समाज कल्याण अधिकारी गुठ्ठे तसेच जि.प.आरोग्य अधिका-यांचा समावेश आहे.
रूग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी प्रशासनाचे पाऊल
जिल्हा परिषदेंतर्गत येणाºया प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गत काही वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी पदे भरण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी आरोग्य संचालकांकडे पाठविला होता.
या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता प्रत्यक्षात पदे भरण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला असून, येत्या आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.