लोकमत न्यूज नेटवर्कचंदनझिरा : येथील विठ्ठलनगरमधील रहिवासी सदानंद शहा यांच्या घरात मंगळवारी सायंकाळी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस टाकीने पेट घेतला. यात घरातील संसारोपयोगी साहित्य जळून भस्मसात झाले. ही आग शेजारील खोलीतही पसरली. मात्र वेळीच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आल्याने मोठा अनर्थ टळाला.सायंकाळी आग लागल्याने घरातील सर्वांनी बाहेर जाऊन आराडाओरड केली. त्यामुळे परिसरातील नागरिक तातडीने मदतीला धावून आले. तोपर्यात आगीत सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले होते. आग विझविण्यायसाठी परिसरातील नागरिकांनी प्रथम टँकरला पाचारण केले. ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दल येईपर्यंत शिवाजी टेकाळे, दत्ताभाऊ गावडे, संतोष भुतेकर, कल्याण शेळके, गणपत गाडेकर, दिनेश दैने संतोष दैने यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अशोक वाजे यांच्या मालकीचे हे घर आहे त्यांनी दोन्ही रूम किरायाने दिल्या आहेत. या आगित घराचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत आग अटोक्यात आली होती. एकूणच या गोंधळामुळे परिसरात नेमके काय घडले हे समजले नव्हते. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:52 AM