लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : अंबड पालिकेतील घनकचरा प्रकल्पाच्या टेंडरचे वादग्रस्त प्रकरण थंड होते न होते तोच पुन्हा एकदा अग्निशमन केंद्रातील बंब विक्रीच्या मुद्यावरून वादंग निर्माण झाले आहे. एकूणच यामुळे भाजपच्या ताब्यात असलेल्या पालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच संशय व्यक्त होत आहे.अंबड पालिका सध्या या - ना त्या कारणाने चांगलीच चर्चेत आली आहे. स्वच्छ प्रशासनाचा नारा देणा-या भाजपकडून अंबड पालिकेत मात्र, नियमांना बगल देऊन कामे उरकण्याचा सपाटा लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अग्निशमन बंबांची विक्री करतांना त्याचे टेंडर काढले होते काय, तसेच ती गाडी विमा कंपनीने विकल्याचा दावा मुख्याधिकारी घोलप करत आहेत. परंतु ही गाडी एक ते सव्वा लाख रूपयांना विकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्या गाडीच्या भंगाराची किंमतही पाच लाख रूपयांच्या पुढेच आली असती, असे विरोधकांचे म्हणणे आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. ही गाडी पालिकेतील सत्ताधा-याच्या नातेवाईकानेच खरेदी केल्याची जोरदार चर्चा पालिकेत मोठी चवीने होत आहे.दुसरीकडे यापूर्वीच घनकचरा प्रकल्पाचे टेंडर हे थेट १२५ टक्क्यांनी जास्तीचे काढण्यात आले होते. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घेऊन अंबडच्या उपविभागीय अधिका-यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमून या प्रकरणाची चौकशी लावली होती. त्यातूनही पालिकेच्या कारभारावर शिंतोडे उडाले आहेत. स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देण्याचे भाजपचे मुद्दे येथे कुठे गेलेत, असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे अंबड पालिकेच्या कारभारावर शंका घेतली जात असल्याचे वास्तव आहे. यामुळे अंबडवासीय देखील या प्रकारामुळे अवाक झाले आहेत.
अग्निशमनच्या गाडी विक्रीवरून ‘आगपाखड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:55 AM