शेगाव-पंढरपुर दिंडी मार्गावरील उड्डाण पुल कोसळला;समयसुचकेमुळे बारा मजूर थोडक्यात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 08:23 PM2018-12-27T20:23:28+5:302018-12-27T20:26:05+5:30
यावेळी समयसुचकेमुळे बारा मजूरांचा जीव वाचला.
तळणी (जालना ) : तळणी परिसरातून जात असलेल्या शेगाव - पंढरपुर मार्गावरील पिंपरखेड येथे उभारण्यात येत असलेला उड्डाणपुलाचे छत कोसळल्याची घटना बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. यावेळी समयसुचकेमुळे बारा मजूरांचा जीव वाचला. यामुळे परिसरात सुरु असलेल्या पुलाच्या कामाविषयी अनेकांनी शंका उपस्थित केल्या.
शेगाव- पंढरपुर या दोन्ही तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी सिमेंट रस्त्याचे गेल्या तीन महिन्यापासून काम सुरु आहे. पिंपरखेड येथे बुधवारी रात्री पुलाच्या छताचा स्लॅब टाकण्यात आला. मात्र काही वेळाताच पुलाचे सेंट्रीग घसरल्याने पुलाचे छत पत्यासारखा खाली कोसळले. पुल कोसळण्याची भनक लागताच परिसरात काम करत असलेल्या मजूरांनी तेथून पळ काढल्याने त्यांचा जीव बालंबाल वाचला. गेल्या काही दिवसापासून या मार्गाच्या कामाविषयी शंका उपस्थित केल्या जात आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणा मजूरांच्या जीवावर बेतला असता. संबधीत कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे, मनसेचे जिल्हा उपाध्याक्ष अॅड राजेश खरात, तालुकाध्यक्ष भाऊ खंदारे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
याबाबत एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांना विचारले असता, पुलाचे काम सुरु असतांना अचानक सेंन्ट्रीग घसरल्याने छत कोसळले आहे. केवळ मेकॅनिकल फेलीयर म्हणावे लागेल. दजार्बाबत शंका घेण्याचे कारण नाही. संबंधित कंत्राटदार नव्याने काम करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.