जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या पंधरा दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहे. त्यांच्या याच उपोषणास्थळी आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मी तुमच्यासोबत आहे. तुमची भूमिका योग्य आहे, असं म्हणत संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी संभाजी भिडे गुरुजींचा मला पाठिंबा मिळणं ही भाग्याची गोष्ट असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले.
संभाजी भिडे यावेळी म्हणाले की, मी राजकारणी नसल्याने घुमवून बोलणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला १०० टक्के यश मिळणार असून सूर्य नक्की उगवणार असल्याचं संभाजी भिडे यांनी सांगितले. तसेच उपोषण मागे घ्या, लढा सुरु ठेवा, अशी विनंती संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुरंधर आहेत. देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत, असं म्हणत संभाजी भिडे यांनी तिघांचे कौतुकही केले.
मी कोणाला दबत नाही. मी माझ्या समाजाला दबतो. सरकारच्या म्हणण्यानुसार मी दोन पावले मागं येतो. परंतु, त्यांना वेळ कशाला हवा? आम्हाला टिकणारे आरक्षण मिळणार का? ते सांगावे. माझं गाव भावनिक झालं आहे. महिला रडतायत. ते माझ्या काळजाला लागतेय. त्यामुळे मी द्विधामनावस्थेत आहे. मंगळवारी दुपारी बैठक घेवून, मी निर्णय कळवितो, अशी माहिती अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी दिली. मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर ते सोमवारी रात्री पत्रकारांसोबत बोलत होते.
शासनाला वेळ हवा असेल तर तो कशाला हवा आहे आणि आम्हाला कायम टिकणारे आरक्षण मिळणार का हे त्यांनी सांगावे. त्याची उत्तरे मला मिळायला हवीत. गावकरी भावूक झाल्याने मी द्विधामनावस्थेत आहे. उद्या दुपारी सर्वांशी चर्चा करतो आणि सांगतो. समाजाचे भलं होत असेल, कायम टिकणारे आरक्षण मिळत असेल तर आपणही उपोषण लावून धरणार नाही. चर्चेनंतर निर्णय घेवू, असे जरांगे म्हणाले.सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले असतील आणि अधिकाऱ्यांना निलंबीत केले असेल तर त्यांच्या निर्णयाचे स्वागत. शासकीय समिती मी आणि माझे सहकारी शासकीय समितीत जाणार नाहीत. आमच्या वतीने समितीत कोणी जाणार नाही. आम्हाला एकच मोह आहे. काही ही करा मराठा समाजाला आरक्षण द्या. आम्ही दोन पावलं मागे येवू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी सोमवारी रात्री घेतली होती.