लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एका युवकाच्या खून प्रकरणात फरार असलेल्या चौथ्या आरोपीस चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी रात्री न्याय डोंगरी (ता. नांदगाव जि. नाशिक) येथे करण्यात आली. ही घटना २ सप्टेंबर रोजी तालुक्यातील सिंधी पिंपळगाव येथे समोर आली होती.बदनापूर तालुक्यातील गवळवाडी येथील गणेश कोंडीअप्पा अलंकार (३०) या व्यक्तीचा २ सप्टेंबर २०१९ रोजी सिंधी पिंपळगाव (ता.जालना) शिवारातील नदीपात्रात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा विशेष कृती दलाने छडा लावला होता. यात गणेश हा जमिन विक्रीसाठी परवानगी मागत सतत त्रास देत असल्याने त्याचा खून केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. या प्रकरणातील चौथा आरोपी बाळू तुकाप्पा अलंकार हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.बाळू अलंकार हा नाशिक जिल्ह्यातील एका गावातील नातेवाईकांकडे असल्याची माहिती पोनि शामसुंदर कौठाळे यांना मिळाली होती. या माहितीवरून न्याय डोंगरी (ता. नांदगाव जि. नाशिक) येथे पथकाने कारवाई केली. त्यावेळी आरोपी बाळू अलंकार हा शेतात काम करीत होता.अटकेतील बाळू अलंकार याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला ६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोनि कौठाळे यांनी सांगितले.
खून प्रकरणातील चौथा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 1:04 AM