२४ फेब्रुवारीपासून गावोगावी रास्ता रोको; मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केली आंदोलनाची पुढील दिशा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 05:14 AM2024-02-22T05:14:56+5:302024-02-22T05:15:30+5:30
जरांगे यांनी बुधवारी अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होती. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात एकाचवेळी रास्तारोको करण्याचे जाहीर केले.
वडीगोद्री (जि. जालना) : महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले, परंतु मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची दिशा जाहीर केली.
जरांगे यांनी बुधवारी अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होती. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात एकाचवेळी रास्तारोको करण्याचे जाहीर केले. जरांगे यांनी राज्य सरकारला आपल्या मागण्यांबाबत २२ व २३ फेब्रुवारी या दोन दिवसांची मुदत दिली. त्यानंतर २४ फेब्रुवारीपासून प्रत्येक गावात दररोज सकाळी १०.३० ते दुपारी १ किंवा संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत एकाच वेळी रास्ता रोको करण्याचा निर्णय झाला. कोणीही जाळपोळ करायची नाही. आंदोलनाचा दहावी-बारावीच्या परीक्षांवर परिणाम होता कामा नये, असेही जरांगे यांनी सांगितले.
...तर वृद्धांनीही उपोषण करावे
२९ तारखेपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी नाही केली, तर १ मार्च रोजी राज्यातील वृद्ध महिला व पुरुष यांनी आमरण उपोषणाला बसायचे आहे.
उपोषणादरम्यान एकाचाही जीव गेला, तर त्यास सरकार जबाबदार असेल. तसेच ३ मार्चला पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीने एकाच ठिकाणी एकच रास्ता रोको करायचा, असेही जरांगे यांनी म्हटले.