लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आंधप्रदेशातून परतूर शहरात गांजाची तस्करी होत असल्याचे विशाखापट्टणम् येथे राज्य सीमा सुरक्षा दलाने सोमवारी केलेल्या कारवाईत समोर आले आहे. या कारवाईत एका वाहनासह दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परतूर तालुक्यात अनेक दिवसांपासून गांजाची अवैध विक्री वाढली आहे. विशाखा पट्टणम जवळील चितपल्ली, अंकपल्ली मधगिरी, गासवाटा या गावातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होते. हा गांजा रेल्वे किंवा चारचाकी वाहनाने परतूर शहरात दाखल होतो. गांजा तस्करी मागे एका राजकीय व्यक्तीचा हात असल्याची शहरात चर्चा रंगली आहे. गांजाची तस्करी सुरू असतानाही पोलीस प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशाखा पट्टणम येथून सोमवारी परतूरकडे येणाऱ्या वाहनाचा सीमा सुरक्षा दलाला संशय आल्याने या वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनात गांजा आल्याने वाहनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, तेथील पोलीस अधिक तपासासाठी परतुरात दाखल होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.दरम्यान, गांजा तस्करीतून गतवर्षी एका युवकाचा विशाखापट्टणम भागात खून झाल्याची घटना ताजी आहे. त्यात आता दोघांना पोलिसांनी पकडल्याने या तस्करीवर शिक्कामोर्तब झाले असून, अवैधरीत्या होणारी गांजाची तस्करी रोखण्यासाठी कारवाई मोहीम राबविली जाणार का, हाच प्रश्न आहे.यासंदर्भात पोलिस उपअधीक्षक सोपान बांगर म्हणाले, अरोपी परतूरचे असले तरी ते नेमके गांजा कुठे पुरवठा करत होते, हे माहिती नाही. तिकडच्या पोलिसांकडून माहिती आल्यानंतर संबंधित गुन्ह्याची अधिक माहिती समजेल.
परतुरात परप्रांतातून गांजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 12:38 AM