डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:53 AM2018-09-21T00:53:33+5:302018-09-21T00:53:49+5:30
: भोकरदन तालुक्यातील पारध खूर्द येथील नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा डेंग्यू सदृश तापाने मंगळवारी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध खूर्द येथील नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा डेंग्यू सदृश तापाने मंगळवारी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पारध खुर्द येथील वाढत्या अस्वच्छतेमुळे गेल्या काही महिन्यांपासून डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. या अस्वच्छतेचा परिणाम म्हणून येथील जि. प. शाळेतील तिसरीत शिकणारी चिमुकली पूजा संजय लक्कस ( वय ९) हिचा मंगळवारी डेंग्यूसदृश्य तापाने मृत्यू झाल्याचा आरोप पूजाच्या नातलगांनी केला आहे. सदर मुलीला गेल्या पाच ते सहा दिवसांपासून थंडी, ताप येऊन डोके दुखत होते. दरम्यान, भोकरदन येथील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले होते. मात्र तिचा ताप कमी होत नसल्याने तिला औरंगाबादेत अधिक उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तेथे उपचार सुरू असताना पूजाचा मृत्यू मंगळवारी झाला. पूजाचे वडील संजय लक्कस यांनी सांगितले की, नेमका काय आजार होता हे एकवीस दिवसांनी निश्चित समजेल. परंतु ही सर्व लक्षणे डेंग्यूचेच असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर मुलीवर बुधवारी सकाळी दहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.