मराठा आरक्षण द्या ! अंगावर पेट्रोल ओतून घेत वकिलाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By दिपक ढोले | Published: September 8, 2023 03:20 PM2023-09-08T15:20:06+5:302023-09-08T15:20:27+5:30
यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ॲड. मारोती भाऊसाहेब वाडेकर यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे हे गेल्या अकरा दिवसांपासून उपोषण करीत आहे. मात्र अद्याप प्रशासनाच्या वतीने कुठलाही निर्णय झालेला नाही. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. शिवाय, लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करत संतप्त मारोती भाऊसाहेब वाडेकर यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलत अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी पोलिसांची उपस्थिती होती.