लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पंतप्रधान आवास योजनेसह अन्य घर बांधकाम करणा-यांना सध्या चांगले दिवस आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत घर बांधकामात अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या स्टीलचे दर चक्क आठ हजार रूपयांनी कमी झाले आहेत. गेल्या वर्षी हे दर ४९ हजार रूपये टन एवढे होते. ते आता ४२ हजार रूपये टनांवर खाली आहेत. सिमेंटेची अवस्थाही तीच असून, टनामागे सिमेंटचे दर ३०० रूपयांनी कमी झाले आहेत.आपल्या स्वप्नातील घर व्हावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतू म्हणतात ना.. लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून त्यामुळे अनेकांचे हे स्वप्न केवळ स्वप्नच राहते. पंरतु आजची स्थिती वेगळी आहे. तुमच्याकडे प्लॉट उपलब्ध असेल तर एक ना अनेक बँका तसेच एलआयसी आणि अन्य वित्त कंपन्या या आपल्या दारी असे म्हणून ग्राहकांचा पाठपुरावा करत आहे.त्यातच आता घर बांधणीत महत्वाचे घटक असलेले स्टील आणि सिमेंट हे घटक स्वस्त झाल्याने सामान्यांनासाठी ही सुखद बाब आहे. तर या जालन्यातील स्टील उद्योगासाठी मात्र ही बाब धक्कादायक आहे.एकीकडे मागणी नसल्याचे सांगितले जात असले तरी, आता वीज वितरण कंपनीने या मेगा उद्योगांना जे वीज बिलाचे टेरिफ ठरवून दिले आहे, त्यामुळे स्टीलचे उत्पादनही घटवता येत नाही. त्यामुळे सध्या स्टील उद्योजकांकडून मागणीपूर्व उत्पादन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे जाणकारांनी सांगितले.एकीकडे स्टील आणि सिमेंट स्वस्त झाले असले तरी बांधकाम करताना क्युरिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. परंतु सध्या पाण्याचे टँकर महागल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. बांधकामाप्रमाणेच स्टील उद्योगालाही मुबलक पाणी मिळत नसल्याने हा उद्योगही पूर्णत: टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.अनुदानामुळे अनेकांना लाभपंतप्रधान आवास योजनेतून ज्यांना स्वत:चे घर नाही, अशासाठी सरासरी दोन लाख रूपयांच्यावर अनुदान मिळत आहे. त्यातच बँकांकडून होणारा वित्तपुरवठा हा देखील गृह प्रकल्पाला चालना मिळत आहे. आणि आता तर दोन प्रमुख घट म्हणजेच स्टील आणि सिमेंटचे दर कमी झाल्याने याला चालना मिळेल, असे या व्यवसायातील जाणकारांनी सांगितले.एकूणच सध्या स्टील जरी स्वस्त असले तरी, वाळू आणि मजुरीत प्रचंड वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन वर्षापूर्वी एक वाळूचा ट्रॅक्टर एक हजार २०० रूपयांना मिळत होता. तो ट्रॅक्टर आता थेट तीन हजार रूपयांवर पोहोचला आहे.तर पूर्वी मिस्त्रीला ३०० रूपये रोज या दराने मजुरी द्यावी लागत होती. ती आता थेट ५०० ते ७०० रूपयांवर पोहोचल्याचे सांगितले. घरासाठी लागणा-या फरशी तसेच अन्य साहित्याच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे.