जलयुक्त शिवार योजनेच्या पुरस्काराचा शासनाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:12 AM2018-04-23T01:12:13+5:302018-04-23T01:12:13+5:30
जलयुक्त शिवार अभियानांच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या संस्था, गावे व व्यक्तींना शासनाने गाजावाजा करून पुरस्कार जाहीर केले. मात्र, सहा महिने उलटूनही या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने अभियानात सहभागी गावांचा उत्साह कमी होत आहे.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जलयुक्त शिवार अभियानांच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या संस्था, गावे व व्यक्तींना शासनाने गाजावाजा करून पुरस्कार जाहीर केले. मात्र, सहा महिने उलटूनही या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने अभियानात सहभागी गावांचा उत्साह कमी होत आहे.
जलयुक्त शिवार अभियाना या महत्त्वाकांक्षी योजनेत लोकसहभाग वाढावा, गावागावांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावे या उद्देशाने राज्यशासनाने महात्मा ज्योतिबा फुले, राजामता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जलमित्र पुरस्कार देण्याचे जाहीर केले. राज्यभरातून या पुरस्कारांसाठी राज्य, विभाग व जिल्हा पातळीवर प्रस्ताव मागविण्यात आले. अभियानाच्या पहिल्या वर्षात (वर्ष २०१५-१६) मध्ये जिल्ह्यातील २१२ गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली. या कामांमुळे पाणीपातळीमध्ये वाढ झाली. अनेक गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, सिंचन क्षेत्रही वाढले. दरम्यान, या अभियानात उत्तम काम करणारी गावे, संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी शासनाने पुरस्कारासाठी प्रस्ताव मागितले. अनेक गावांनी जिल्हास्तरीय समितीकडे आपले प्रस्ताव सादर केले. समितीने प्राप्त प्रस्तावांचे मूल्यांकन करून शासनाला अहवाल सादर केला. यामध्ये मंठा तालुक्यातील किनखेडा (ता.मंठा) गावाने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत शासनाने एक लाख रुपयांचा प्रथम तर जालना तालुक्याला पाच लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर केला. त्याचबरोबर जालना तालुक्यातील सामनगाव, अंबड तालुक्यातील दुनगाव, बदनापुरातील म्हात्रेवाडी आणि घनसावंगीमधील गुरुपिंप्री या गावांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाले. अभियानात योगदान देणाºया सामाजिक संस्था व व्यक्तींनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले. जालना येथे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यासाठी २२ नोव्हेंबर २०१७ निश्चित करण्यात आली. मात्र, २२ नोव्हेंबर २०१७ रोजी जलसंधारण मंत्री अपरिहार्य कारणामुळे आलेच नाहीत. त्यामुळे लवकरच या पुरस्कारांचे वितरण केले जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, सहा महिने उलटूनही पुरस्काराचे वितरण झालेच नाही. त्यामुळे पुरस्कारप्राप्त गावांमध्ये नाराजीची भावना असून, अभियानाच्या दुसºया, तिसºया टप्प्यात सहभागी गावांचा उत्साह मावळत आहे. महापुरुषांच्या नावाने जाहीर केलेल्या पुरस्कारांचे वितरणच करायचे नाही याबद्दल किनखेडा ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.