लोकमत न्यूज नेटवर्कजालना : औरंगाबाद येथील चुलत्याच्या तेराव्यासाठी (गोडजेवणासाठी) जुना जालना शंकरनगर भागातील रिक्षाचालक रमेश रामलाल जाधव यांच्या रिक्षातून बुधवारी सकाळी ८ वाजता रमेश व त्यांची पत्नी वगळता घरातील कुटुंब निघाले असताना औरंगाबाद जिल्ह्यातील शेकट्याच्या पुढे त्यांच्यावर काळाने घाला घातला. भरधाव कारने समोरून जोरदार धडक दिल्याने रिक्षातील पाचही जण जागीच ठार झाल्याची माहिती कळताच शंकरनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविणारे रमेश जाधव यांच्या चुलत्याचे दहा दिवसांपूर्वी औरंगाबादेतील बेगमपुरा येथे निधन झाले. त्यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम बुधवारी होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाधव कुटुंब स्वत:च्या रिक्षातून औरंगाबादकडे जात होते. रिक्षा दिनेश जाधव हे चालवत होते. ते औरंगाबादकडे जात असल्याने बरोबर डाव्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना कारने जोरदार धडक दिली. यात रिक्षातील पाचही जण ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच या प्रभागाचे नगरसेवक माऊली ढवळे तसेच त्यांच्या मित्रांनी औरंगाबाद गाठले. त्यांनी तेथे जाधव कुटुंबाला पूर्ण ती वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.जाधव कुटुंबातील मधला भाऊ रमेश जाधव आणि त्यांची पत्नी घरी थांबल्याने ते या अपघातातून बचावले. त्यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. दिवसभर ते व त्यांच्या पत्नीने पाण्याचा घोटही घेतला नाही. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.शंकरनगरात २५ वर्षांपासून वास्तव्यशंकरनगर परिसरात जाधव परिवार हा गेल्या २५ वर्षापासून वास्तव्यास आहे. त्यामुळे त्यांचे आणि शंकरनगरवासियांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्याची माहिती त्यांच्याशेजारील प्राचार्य अॅड. दिनकर पाठक यांनी दिली. तसेच पूर्वीचे शिवसेनेचे नगरसेवक राम सतकर हे देखील मदतीसाठी धावून आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर जाधव कुटुंबाच्या घराजवळ विशेष करून महिलांनी मोठी गर्दी केली होती. अनेक ज्येष्ठ महिलांनी रमेश जाधव व त्यांच्या पत्नीची भेट घेऊन त्यांचे अश्रू पुसले. तसेच पाणी आणि दोन घास खाण्याची विनंती केली, परंतु त्यांनी कोणाची विनंती ऐकली नाही.शंकरनगर येथील जाधव कुटुंबातील दिनेश रामलाल जाधव (३२), रेणुका दिनेश जाधव (२५), अतुल दिनेश जाधव (६ महिने), वंदना गणेश जाधव (२७), सोहम गणेश जाधव (९) या पाच जणांवर काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.जो तो जाधव कुटुंबांच्या आठवणी सांगत होता. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा जालन्यातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
अपघाताची वार्ता कळताच शंकरनगर शोकाकुल, अनेकांना अश्रू अनावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 1:20 AM