तीन महिन्यांपूर्वी राजूर ते केदारखेडा मार्गावर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा हायवा महसूल विभागाच्या पथकाने पकडला होता. पथकाने सदर हायवा राजूर पोलिसांच्या ताब्यात दिला होता. हायवा पोलीस चौकीत उभा करण्यात आला होता; परंतु हायवा चालक सुदाम पंढरीनाथ नागवे (रा. बोरगाव तारू, ता. भोकरदन) याने १६ डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्री पोलीस चौकीच्या आवारातून तारकंपाऊंड तोडून हायवा लंपास केला होता. याप्रकरणी नागवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते; परंतु तो पोलिसांना गुंगारा देत होता. रविवारी सुदाम नागवे गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हसनाबाद ठाण्याचे सपोनि. संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शिवाजी देशमुख, पोलीस नाईक गणेश मान्टे, संतोष वाढेकर यांनी सोमवारी पहाटे साडेचार वाजता त्याला हायवासह पकडले. दुपारी भोकरदन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सुदाम नागवेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस चौकीतून पळविलेला हायवा पोलिसांनी केला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:33 AM