पवित्र कुरआन मानवी जीवनात क्रांती घडवणारा सर्वश्रेष्ठ ग्रंथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:16 AM2018-09-20T00:16:11+5:302018-09-20T00:16:33+5:30
समाजातील प्रत्येकाने पवित्र कुरआनची शिकवणी आपल्या जीवनात अंगिकारावी, असे आवाहन गुडविल एज्युकेशन सोसायटीचे सचिव अब्दुल हफीज यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पवित्र कुरआन हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ असून, या ग्रंथातील शिकवण मानवी, सामाजिक जीवनामध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या आहेत. आपले जीवन सफल होण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पवित्र कुरआनची शिकवणी आपल्या जीवनात अंगिकारावी, असे आवाहन गुडविल एज्युकेशन सोसायटीचे सचिव अब्दुल हफीज यांनी येथे केले.
गुडविल एज्युकेशन सोसायटीच्यावतीने ‘आओ कुरआन समझे’ या शीर्षकावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित ३ दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अब्दुल हफीज बोलत होते. यावेळी अरेबीक भाषेचे तज्ज्ञ मार्गदर्शक अब्दुल रहीम (हैदराबाद) यांची प्रमुख उपस्थिती होती.
ही कुरआनवर आधारित कार्यशाळा दि. १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान पार पडली. यावेळी अब्दुल रहीम (संचालक, अन्डरस्ॅटण्ड कुरान अॅकॅडमी) यांनी उद्घाटन केले. त्यानंतर अब्दुल रहीम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या ३ दिवशीय कार्यशाळेत नमाजाचे महत्त्व आणि तो कशा पध्दतीने अदा करावा याची पध्दती नमूद केली. दररोज २ सत्रात ही कार्यशाळा घेण्यात आली. अरेबीक आणि उर्दू भाषेतील उपयुक्त पुस्तके आणि साहित्य या सत्रांच्या प्रारंभी उपस्थितांना मोफत देण्यात आली. कार्यशाळेस मुस्लिम समाजातील महिला व पुरूषांची मोठी उपस्थिती होती. जालना शहरात प्रथमच या विषयावर आयोजित धार्मिक कार्यशाळेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अरेबीक भाषेचे तज्ज्ञ मार्गदर्शक अब्दुल रहीम यांनी अत्यंत सोप्या पध्दतीने कुरानातील तत्त्वज्ञान उपस्थितांना समजावून सांगितले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक तथा राष्टÑवादी काँग्रेसचे नेते इक्बाल पाशा, माजी मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल्ला, समाजसेवक कामरान खान, जमात-ए-इस्लामी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा अतिया सलीम यांनी कौतुक केले. सय्यद अब्दुल मतीन हुदाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी हफीज जुबेर फारुखी, अब्दुल मुजीब, सोहेल मोहम्मदी आणि गुफरान अहेमद सिद्दीकी यांनी आपले विचार मांडले.
या कार्यशाळेनंतर पाठक कॉम्प्लेक्स, मुक्तेश्वरव्दार, कचेरी रोड, येथे कुरआन सेंटरचे उद्घाटन अब्दुल गफ्फार यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर अब्दुल रहीम यांनी महिला व पुरुषांना २ वेगवेगळ्या सत्रात पवित्र कुरआन शिकविण्याचे प्रशिक्षण दिले. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात हफीज शब्बीर अहेमद यांच्या कुरआन पठणाने झाली. अशा प्रकारच्या कार्यशाळा नियमित आयोजित करण्यासाठी प्रयत्न करू असे हफिज यांनी सांगितले.