आष्टीत घटस्थापनेच्या मुहुर्तावर झाली घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:03 AM2019-10-01T01:03:05+5:302019-10-01T01:03:21+5:30
घरातील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवत रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : चोरट्यांनी घटस्थापनेचा मुहूर्त साधत सोमवारी पहाटे आष्टी येथील एका कापड व्यावसायिकाच्या घरी चोरी केली. घरातील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवत रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला.
परतूर तालुक्यातील आष्टी येथील मुख्य रस्त्यावर आणि स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या शेजारी कापड व्यावसायिक बाबासाहेब लुंगारे यांचे घर आहे. लुंगारे व त्यांचे कुटुंबिय रविवारी रात्रीच्या सुमारास घरात झोपले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी लुंगारे यांच्या घराचा कडीकोंडा वाकवून आतमध्ये प्रवेश केला. घरात झोपलेल्या पार्श्वनाथ बाबासाहेब लुंगारे (२३) याला चाकूचा धाक दाखवित कपाटाबाबत विचारणा केली. कपाटातील रोख ४० हजार, सोन्याचे दागिने असा दीड लाख रूपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. मुख्य रस्त्यावर आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शेजारीच घटस्थापनेच्या मुहुर्तावर घरफोडी झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच घटनास्थळी दाखल श्वानाने काही अंतरापर्यंतच माग काढला. फ्रिंगर प्रिंट पथकाने काही ठिकाणचे ठशांचे नमुने घेतले आहेत. लुंगारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा लवकरच छडा लावला जाईल, असे आष्टी ठाण्याचे सपोनि एस. बी. सानप यांनी सांगितले.