मंत्रिमंडळात जिल्हावासियांना टोपे, गोरंट्याल यांच्या रूपाने मंत्रीपदाची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:58 AM2019-11-27T00:58:54+5:302019-11-27T00:59:23+5:30
राष्ट्रवादीच्या कोट्यातून १२ वर्ष मंत्री राहिलेले आ. राजेश टोपे यांचे नाव मंत्रिमंडळात निश्चित मानले जात आहे. परंतु जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देणाऱ्या जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्यमंत्री म्हणून संधी मिळणार काय, बद्दल आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार येणे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचे नावही जाहीर झाले असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी तीन पक्षांची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर येणार आहे. त्यामुळे आता मंत्री मंडळात कोणाची वर्णी लागते, याबाबत जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे. यात राष्ट्रवादीच्या कोट्यातून १२ वर्ष मंत्री राहिलेले आ. राजेश टोपे यांचे नाव मंत्रिमंडळात निश्चित मानले जात आहे. परंतु जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देणाऱ्या जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्यमंत्री म्हणून संधी मिळणार काय, बद्दल आता तर्क-वितर्क लावले जात आहेत. यापूर्वी युतीच्या काळात जालन्यात तीन मंत्री होते. त्यात आता केंद्रातील राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे एकमेव मंत्री कार्यरत आहेत.
जालना जिल्हा हा गेल्या काही वर्षात युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यात शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व होते. पूर्वी शिवसेनेचे तीन आमदार होते. परंतु आता चित्र बदलले आहे. आज भाजपचे तीन आमदार आहेत, तर शिवसेनचा एकही आमदार जालना जिल्ह्यात नसल्याचे वास्तव आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना या निवडणुकीत काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्यानी धोबीपछाड दिली. तसेच घनसावंगी मतदारसंघात डॉ. हिकमत उढाण यांनी मोठी खिंड लढवून टोपेंच्या नाकी नऊ आणले होते. परंतु नंतर तीन हजार २५० मतांनी टोपेंचाच विजय झाला.
जालना जिल्ह्यात यापूर्वी भाजपचे बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि केंद्रात राज्यमंत्री रावसाहेब दानवे होते. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही साडेचार वर्षे दानवेंकडेच असल्याने जालना हे राजकारणाचे मोठे शक्तीस्थान बनले होते. आज ही परिस्थिती बदलली आहे. आता युती ऐवजी महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या मंत्री मंडळात राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते हे भाजप आणि शिवसेनेत जात असताना राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीवर निष्ठा कायम ठेवली. तर काँग्रेस पक्षाची सर्वत्र धूळधाण होत असताना जालन्यात मात्र, कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसचा गड निष्ठा ठेवून कायम ठेवला.
२०१६ मध्येही नगर पालिकेच्या निवडणुकीत गोरंट्याल यांनी पालिका आपल्या ताब्यात ठेवून काँग्रेसचे अस्तित्व जालन्यात स्वत:च्या हिमतीवर कायम ठेवले. त्यामुळे अत्यंत अडचणीच्या काळात गोरंट्याल यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहून विजय मिळविल्याने त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गोरंट्याल यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वास दिले होते. ते आश्वासन पाळण्याची वेळ आता आली आहे.
खोतकर, उढाणांचा पराभव जिव्हारी
आज शिवसेनेचे नेते तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होत आहेत. मागील मंत्रिमंडळात खोतकर हे दुग्धविकास राज्यमंत्री होते. परंतु त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. तर मातोश्रीच्या निकटवर्तियांमध्ये असलेले डॉ. हिकमत उढाण यांनीही चुरशीची लढत देत टोपे यांना शेवटपर्यंत झुंजवत ठेवले होते. परंतु जो जिता वही सिकंदर या म्हणीचा प्रत्यय येथे आला. यात टोपे यांनी बाजी मारली. खोतकर आणि उढाण यांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी न लागल्यासच नवल.