सुधारित००० पत्नीचा खून करून पती फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:27 AM2021-01-17T04:27:10+5:302021-01-17T04:27:10+5:30
भोकरदन : पत्नीचा खून करून घराला कुलूप लावून फरार झालेल्या पतीला भोकरदन पोलिसांनी दोन तासांत जेरबंद केले. परंतु, पतीनेही ...
भोकरदन : पत्नीचा खून करून घराला कुलूप लावून फरार झालेल्या पतीला भोकरदन पोलिसांनी दोन तासांत जेरबंद केले. परंतु, पतीनेही विषारी द्रव प्राशन केले असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना तालुक्यातील कुंभारी येथे शनिवारी सायंकाळी समोर आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
आशा रतन साळवे (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. कुंभारी येथील रतन सांडू साळवे (वय ४५) व त्यांच्या पत्नी आशा रतन साळवे हे कामानिमित्त वडगाव कोल्हाटी (ता. औरंगाबाद) येथे राहतात. त्यांच्यासोबत एक १७ वर्षांचा मुलगा व एक मुलगी राहत होती. १५ जानेवारी रोजी कुंभारी ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने हे दोघे पती-पत्नी १४ जानेवारी रोजी गावी आले होते. ते हसनाबाद रोडवरील राहुलनगर झोपडपट्टी परिसरातील घरात थांबले होते. १६ जानेवारी रोजी सकाळी या दाम्पत्याना शेजाऱ्यांनी घरात पाहिले. मात्र, सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराला बाहेरून कुलूप दिसून आले तर घरातील लोखंडी पलंगावर आशा साळवे या झोपलेल्या दिसून आल्या. ग्रामस्थांना संशय आल्यानंतर त्यांनी ही माहिती भोकरदन पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलशिग बहुरे, पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे, पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस कर्मचारी रामेश्वर शिंनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
शॉक लागल्याचा केला बनाव
आशाबाईंचा मृतदेह ज्या पलंगावर सापडला त्या पलंगाला शेगडी लावण्यात आली होती. त्या शेगडीचे वायर पलंगाला लावून आशाबाई यांना शॉक लागल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या पाहणीत दिसून आले.
बहिणीच्या घरातून घेतले ताब्यात
पत्नीचा खून केल्यानंतर पती भोकरदन येथील बहिणीच्या घरी गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. परंतु, त्यानेही विषारी द्रव प्राशन केल्याचे समोर आले. त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.