जालना : तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला एवढाचा संक्रांतीच्या सणाचा अर्थ नाही. या हिंदू संस्कृतीत महिलांसाठी महत्त्वाची असलेली संक्रांत तेवढीच पुरूषांसाठी देखील महत्त्व ठेवते. घर, समाजातील ज्येष्ठांकडून तिळगूळ घेऊन आपण आशीर्वाद घेत असतो. या सणाला वाण देण्याची एक मोठी परंपरा आहे, ती आजही जोपासली जाते. संक्रांत म्हणजे महिलांसाठी एक प्रकाराचा भेटी-गाठींचा सण म्हणूनही ओळखला जातो. या सणा निमित्त एकमेकींकडे हळदी-कुंकवासाठी जाण्याची पध्दत आहे. संक्रांत सण आला की, मला एक दहा वर्षापूर्वीची आठवण नेहमी ताजी होते, प्रसिध्द नाट्य लेखक प्रा. राजकुमार तांगडे हे मूळचे घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थचे आहेत. जांब समर्थ हे रामदास स्वामींचे जन्मगाव होय, या गावात मी आणि माझे पती हे दोघेही तांगडेंकडे कामानिमित्त गलो होतो. त्यावेळी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो असता, तेथे संक्रांतीला मंदिरातील दर्शन आटोपल्यावर पत्नीच्या पायावर डोके ठेवून पतीने पाया पडण्याची परंपरा आहे. यामुळे आम्ही हे एकूण अवाक झालो. ही परंपरा येथे यामुळे असावी, की समर्थ रामदास स्वामी हे ऐन लग्न मंडपातून निघून गेले होते. त्यामुळे त्यांना पश्चाताप होऊन त्यांनी आपल्या दर्शनसाठी आलेल्या पती-पत्नीमध्ये सामंजस्य राहावे म्हणून पतीने या मंदिरात पत्नीच्या पाया पडण्याची प्रथा रूजली असावी, अशी आख्यायिका आहे.
जांब समर्थची ‘ती’ अनोखी संक्रांत कायम स्मरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:57 AM