बदनापूर : तालुक्यातील हालदोला येथे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून शेतात आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडली. देविदास विठ्ठलराव मात्रे ( ५२ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कर्ज फेडण्यासाठी बँकेचा तगादा आणि खाजगी सावकाराकडून मिळणाऱ्या धमक्या याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी एका चिट्ठीमध्ये नमूद केले आहे.
शेतकरी देविदास विठ्ठलराव मात्रे यांची हालदोला शिवारात ७ एकर शेती आहे. त्यांच्या डोक्यावर बँक आणि खाजगी सावकाराचे कर्ज होते. कर्जफेडीसाठी बँकेमधून त्यांना दोन नोटीस आल्या होत्या. त्यांनी बँकेत भेट देऊन मुद्दल भरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, अधिकाऱ्याने काहीएक न ऐकता घरावर जप्ती करण्याचा इशारा दिला. यामुळे ते व्यथित झाले होते. तसेच शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी घरखर्च आणि शेतीसाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडून सुद्धा सावकाराने चेक परत न देता आणखी रक्कम मागितली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यासर्व प्रकाराने देविदास मात्रे नैराश्यात गेले होते. यातूनच त्यांनी आज पहाटे शेतात विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,तिन मुले,एक मुलगी,जावई,सुना असा परीवार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब मात्रे यांनी सांगितले की, शेतकऱ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक शेलगावचे ९ लाख रुपये आणि गृहकर्ज व ४ क्रॉप लोन होते. मी सोमवारी त्यांच्यासोबत या बँकेत गेलो होतो. त्यांनी बँक अधिकाऱ्यांना कर्ज प्रकरणात मुद्दल भरायला तयार असून तडजोड करण्याची विनंती केली. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही. उलट कठोर पवित्रा घेत आम्ही तुमच्या घरावर जप्ती आणू असे सुनावले होते. त्यामुळे ते व्यथित झाले होते अशी माहिती दिली.
सध्या मी कर्जबाजारी आहेदेविदास विठ्ठलराव मात्रे यांनी एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यानुसार, मला बँकेच्या दोन वेळा नोटीसा आल्या असून दोन वेळेस बँकेत बोलावले. आम्ही घरावर जप्ती आणू असे त्यांनी सांगितले. सध्या मी कर्जबाजारी आहे. कर्ज फेडण्यासाठी मला चार ते पाच वर्षांपासून शेतीने साथ दिली नाही. या कारणाने, मी सावकाराकडून कर्ज घेतले. ते व्याजासगट कर्ज परत केले. परंतु, सावकाराने माझे चेक परत दिले नाही, उलट जास्त पैसे दया नाही तरी जिवे मारू अशा धमक्या दिल्या. सावकाराकडून माझ्या कुटुंबास त्रास झाला. माझ्याकडे कोणतेच कर्ज राहीले नाही. मी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. असे नमुद करून त्यांनी खाली सही केली आहे. तसेच जवळच्या नातेवाईकांची नावे लिहून त्यांनी कुटुंबाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.