जालना : मी कोणाला दबत नाही. मी माझ्या समाजाला दबतो. सरकारच्या म्हणण्यानुसार मी दोन पावले मागं येतो. परंतु, त्यांना वेळ कशाला हवा? आम्हाला टिकणारे आरक्षण मिळणार का? ते सांगावे. माझं गाव भावनिक झालं आहे. महिला रडतायत. ते माझ्या काळजाला लागतेय. त्यामुळे मी द्विधामनावस्थेत आहे. मंगळवारी दुपारी बैठक घेवून, मी निर्णय कळवितो, अशी माहिती अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी दिली. मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर ते सोमवारी रात्री पत्रकारांसोबत बोलत होते. सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले असतील आणि अधिकाऱ्यांना निलंबीत केले असेल तर त्यांच्या निर्णयाचे स्वागत. शासकीय समिती मी आणि माझे सहकारी शासकीय समितीत जाणार नाहीत. आमच्या वतीने समितीत कोणी जाणार नाही. आम्हाला एकच मोह आहे. काही ही करा मराठा समाजाला आरक्षण द्या. आम्ही दोन पावलं मागे येवू.
शासनाला वेळ हवा असेल तर तो कशाला हवा आहे आणि आम्हाला कायम टिकणारे आरक्षण मिळणार का हे त्यांनी सांगावे. त्याची उत्तरे मला मिळायला हवीत. गावकरी भावूक झाल्याने मी द्विधामनावस्थेत आहे. उद्या दुपारी सर्वांशी चर्चा करतो आणि सांगतो. समाजाचे भलं होत असेल, कायम टिकणारे आरक्षण मिळत असेल तर आपणही उपोषण लावून धरणार नाही. चर्चेनंतर निर्णय घेवू, असे जरांगे म्हणाले.