कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:24 AM2019-01-25T00:24:18+5:302019-01-25T00:24:25+5:30
उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा न करता पशुंना होणारे आजार, त्रास यावर लक्ष ठेवून उपचार करावे, जर कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा इशारा जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी अधिका-यांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते. जर पाणी मिळाले तर ते दूषित असण्याची शक्यता असते. तसेच उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा न करता पशुंना होणारे आजार, त्रास यावर लक्ष ठेवून उपचार करावे, जर कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा इशारा जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी अधिका-यांना दिला.
गुरुवारी अध्यक्ष खोतकर यांनी जिल्ह्यातील पशुधनविकास अधिकारी, सहाय्यक पशुधन अधिकारी व पशुनधन पर्यवेक्षकांची बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले.
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाई भासत असून, जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. जर पाणी मिळाले तर ते दूषित असते. तसेच उष्णतेमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असल्याने पशुधनविकास अधिकारी, सहायक पशुधन अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांनी कोणताही निष्काळजीपणा न करता पशुंना होणारे आजार व त्रास यावर लक्ष ठेवून उपचार करावेत. दुष्काळी परिस्थितीच्या काळात अधिका-यांनी दिवसभर दवाखान्यातच राहावे. अधिकारी दवाखान्यात उपलब्ध नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी खोतकर म्हणाले.
दुष्काळी परिस्थिती जनावरांना पाणी, चाराटंचाई भासू नये, तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिका-यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने भरारी पथक नेमण्यात येणार आहे. या काळात जर अधिका-यांनी कामात निष्काळजीपणा केल्यास त्या अधिका-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.