वाहनचालक चुकले तर, फाडणार ई-चालान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:36 AM2019-05-08T00:36:43+5:302019-05-08T00:37:02+5:30
वाहतूक शाखेचा कारभार पारदर्शी व्हावा, तसेच दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की, पोलिसांच्या खिशात, याबाबतही संशय व्यक्त केला जातो. यामुळे यात पारदर्शकता आणण्यासाठी गृहविभागाने ई - चालान पध्दती सुरु करण्याचा निर्णय घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वाहतूक शाखेचा कारभार पारदर्शी व्हावा, तसेच दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की, पोलिसांच्या खिशात, याबाबतही संशय व्यक्त केला जातो. यामुळे यात पारदर्शकता आणण्यासाठी गृहविभागाने ई - चालान पध्दती सुरु करण्याचा निर्णय घेतला. या प्रणालीचा शुभारंभ मंगळवारी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या हस्ते करण्यात आला.
रस्त्यावर धावताना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. यामुळे गृहविभागाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कागदी चालान बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची जरब वाढणार आहे. यापूर्वीच काही जिल्ह्यात एक राज्य एक ई चालान प्रणालीव्दारे वाहतूक शाखा स्मार्ट झाल्या होत्या. मात्र, जालना जिल्ह्यातील अंमलबजावणी खोळंबली होती. गृह विभागाने वाहतूक शाखेला पत्र पाठवून याविषयी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना केल्या होत्या, यामुळे जिल्ह्यातील ७७ पोलीस कर्मचाऱ्यांना या मशिनविषयी प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर मंगळवारी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या हस्ते सुविधेचा शुभारंभ मामा चौकात प्रणालीचा करण्यात आला. या प्रणालीसाठी एम- स्वाईप मशिन पुरविण्यात आल्या आहेत. मोबाईलसारखी ही मशीन असणार आहे. त्याला ब्लूटूथने प्रिंटर जोडले आहे. या पध्दतीमुळे चोरीचे वाहन, चालकाचा परवाना याची माहितीही तात्काळ मिळणार आहे. दंडाची रक्कम थेट अपर पोलीस महासंचालकाच्या वाहतूक शाखेकडे जमा होणार आहे. तेथून ही रक्कम जिल्हा शाखेच्या खात्यात वळती होणार असल्याचे सांगण्यात आले.
वाहतुकीला शिस्त लावताना वाहनांवर विविध नियमानुसार दंड आकारला जातो. अनेकदा हा दंड अवास्तव असल्याची ओरड होते. दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की नाही, याबाबत संशय घेण्यात येतो. यामुळेच या पारदर्शकता यावी या उद्देशाने ई-चालान प्रणाली सुरु करण्यात आल्याची सांगण्यात येत आहे. फाडलेल्या चालानवर शासकीय नियमानुसार दंडाची रक्कम राहणार आहे. ती रक्कम अपर पोलीस महासंचालकाच्या वाहतूक शाखेला तात्काळ नोंदविली जाणार आहे. त्याचे स्वतंत्र सॉफ्टवेअर आहे. प्रसंगी डेबिट कार्डवरुनही रक्कम वळती करता येणार आहे. ज्याने दंड भरला, त्याला अधिकृत पावती दिली जाणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार होण्यास वाव राहणार नाही. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
या प्रणालीच्या शुभारंभा नंतर लगेचच ती कार्यान्वित करण्यात आली आहे.
परवानाधारकांचा तपशील कळेल
या प्रणालीला आरटीओ आणि पोलीस खात्याशी जोडण्यात आले आहे. यामुळे एखादे वाहन पकडले तर ते वाहन यापूर्वी कुठल्या गुन्ह्यात वापरले गेले होते काय, चालकावर गुन्हे आहेत काय, याची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.