हाताला काम नाही तर पोट कसं भरावं..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:48 AM2019-02-06T00:48:17+5:302019-02-06T00:48:37+5:30
जिल्ह्यातील दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मनरेगाच्या माध्यमातून कामे देण्यात येत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात हाताला काम नाही. त्यामुळे स्वत:चे आणि कुटुंबाचे पोट कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या चिंतेतूनच परतूर, मंठा, घनसावंगी तालुक्यातील मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
या तीन तालुक्यांतील संतप्त मजुरांनी जालना जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. जवळपास ५० गावातील मजूरांनी कामाची मागणी केली असून, दररोज एका दिवशी एका गावातीलच मजूर उपोषणाला बसत आहेत.
आज आम्ही कामासाठी आंदोलन करीत आहोत. येणाऱ्या काही दिवसांतच आम्हाला पाण्यासाठीही आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. आम्हाला कामाबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे. मजुरांना काम देण्याचा मुद्दा मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेतही गाजला.
यावेळी सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले की, या मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी दोन दिवसांत नियोजन केले जाईल.
निमा अरोरा यांच्या या आश्वासनाचे खालील अधिकारी आणि प्रशासन किती दखल घेतात, यावरच या परिसरातील ग्रामस्थांचा रोजगार अवलंबून राहणार आहे.
पाण्यासाठीही करावी लागते भटकंती
आज आम्ही कामासाठी आंदोलन करीत आहे. तर येणा-या काही दिवसांतच आम्हाला पाण्यासाठीही आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. कारण आम्हाला कामाबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे.
माझ्याकडे शेती नाही. गावातही काम मिळत नाही. मुलांना शिक्षणासाठी मोठा खर्च लागतो. त्यातच काम मिळत नसल्याने पोट कसं भरावं, असा प्रश्न पडला आहे.
- नामदेव कोरडे, आंबा