राजुरात महिलांनीच पकडली अवैध दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:43 AM2018-06-04T00:43:14+5:302018-06-04T00:43:14+5:30
देशी दारू विक्री बंद व्हावी यासाठी आंदोलन करूनही काहीच उपयोग होत नसल्याने संतप्त महिलांनी देशी दारू विक्रेत्याला अडवून अवैध दारू जप्त केली. महिलांचा रौद्र अवतार पाहून दारू विक्रेत्याने धूम ठोकली
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : येथील देशी दारू विक्री बंद व्हावी यासाठी आंदोलन करूनही काहीच उपयोग होत नसल्याने संतप्त महिलांनी देशी दारू विक्रेत्याला अडवून अवैध दारू जप्त केली. महिलांचा रौद्र अवतार पाहून दारू विक्रेत्याने धूम ठोकली. या प्र्रकारामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
राजूर येथे मुख्य रस्त्यालगत पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे २० ते २५ देशी विदेशी दारूच्या दुकाना सुरू आहेत. यातील काही दुकाना बेकायदेशी आहे. मुख्य वस्तीत सर्रास दारू विक्री होत असल्याने नागरिकांसह महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दारू सहज उपलब्ध होत असल्याने व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत.
त्यामुळे महिलांनी एकत्रत येवून देशी घरपोच दारू आणून देणाऱ्यांवर पाळत ठेवली. शनिवारी रात्री आठच्या सुमारास विलास धंदाले (रा. लोणगांव ता. भोकरदन) हा दुचाकीवर देशी दारू घेऊन येताना महिलांनी पाहिले. महिलांनी त्याला रस्त्यातच अडविले. त्यामुळे त्याने दारूचे दोन बॉक्स जागेवरच सोडून देत पळ काढला.
महिलांनी दारू पकडल्यानंतरही पोलिसांनी घटनास्थळी येऊन कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आता थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे गीताबाई जीतकर, जिजाबाई शेळके, उषाबाई लोणकर, रत्नाबाई सूर्यंवशी आदी महिलांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस नाईक प्रताप चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संशयित विलास धंदाले याच्या विरूध्द राजूर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.