फोटो
देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगावमही शिवारापासून ते हिवरखेड पूर्णाशिवारापर्यंत वाळू माफियांनी खडकपूर्णा नदीचे पात्र पोखरण्यास सुरूवात केली आहे. राजरोस वाळूचा अवैध उपसा, वाहतूक होत असला तरी सिंदखेडराजा महसूल उपविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
देऊळगावमही, डिग्रस (बु.), डिग्रस खुर्द, साठेंगाव, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा या गावाच्या शिवारातून प्रवाहित होणाऱ्या खडकपूर्णा नदीच्या तिरावर १० ते १२ किलोमीटर ४० ते ५० ट्रॅक्टरसह इतर वाहनातून विनापरवाना वाळू उपसा किन्हीचा केला जात आहे. एका रात्रीत तीन ते चार वाहनावर कारवाई होते. इतर ४० ते ५० वाहने ही वाळूची चोरी करीत आहेत. चोरलेली वाळू चिखली, बुलडाणा, सिंदखेडराजा तालुक्यातील बहुतांश गावात वाहतूक केली जाते. देऊळगावमही येथून बुलडाणा, चिखलीकडे मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा प्रवाह वाढत आहे. याकडे जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.