डीवायएसपी कार्यालयासह ठाण्यातही प्रभारीराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:58 AM2021-02-05T07:58:09+5:302021-02-05T07:58:09+5:30
परतूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचे वास्तव्य आहे. सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. इतर गुन्हेगारीही अधून ...
परतूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचे वास्तव्य आहे. सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. इतर गुन्हेगारीही अधून मधून डोके वर काढत असते. यातच येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात प्रभारी अधिकारी आहेत. या ठिकाणी कार्यरत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान बांगर हे दि. ३१ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त झाले. तेव्हापासून येथे प्रभारी अधिकारी आहेत. सध्या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार भोकरदनचे डीवायएपी इंदलसिंग बहुरे यांच्याकडे आहे. तसेच पोलीस ठाणेदेखील बारा दिवसांपासून प्रभारी पोलीस निरीक्षकांवर आहे. या ठिकाणी निरीक्षक म्हणून शिरीष हुंबे हे होते, त्यांच्या कार्यकाळात या पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक म्हणून नीलेश तांबे व गौर हसन हे दोन अधिकारी प्रत्येकी तिन महिने काम पाहून गेले. हुंबे आता जालना येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. आता ते परतूरला येण्याची शक्यता नसल्याचेही सांगण्यात येते. सध्या पोलीस ठाण्याचा पदभार सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्याकडे आहे. एकूणच या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर प्रभारी अधिकारीच आहेत. प्रभारीराजमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.