प्राप्तीकर विभागाचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 11:58 PM2019-03-07T23:58:38+5:302019-03-07T23:58:53+5:30
जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद येथील सराफा व्यापाऱ्यांवर गुरुवारी सकाळपासूनच प्राप्तीकर विभागाने छापे टाकून झाडाझडती घेतल्याने दोन्ही शहरांमध्ये खळबळ उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन/जाफराबाद : जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद येथील सराफा व्यापाऱ्यांवर गुरुवारी सकाळपासूनच प्राप्तीकर विभागाने छापे टाकून झाडाझडती घेतल्याने दोन्ही शहरांमध्ये खळबळ उडाली होती.
मार्च महिना असल्याने प्राप्तीकर विभागाला किती कारवाई केली, याचे उद्दिष्ट सरकारला दाखवावे लागते. तसेच काही व्यापारी, उद्योजक, कंत्राटदारांनी उत्पन्नाचे स्त्रोत कमी असताना उत्पन्न जास्तीचे केल्याने देखील ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी सकाळी ९ वाजेपासूनच शहरातील दोन ते तीन सराफा व्यापाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत प्राप्तीकर विभागाचे सहा अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईमध्ये नेमके किती घबाड सापडले, याचा तपशील रात्री उशिरापर्यत कळू शकला नाही.
एकूणच भोकरदन, जाफराबाद प्रमाणे जालन्यातही काही ठिकाणी कारवाई करण्यात आल्याची बाजारपेठेत जोरदार चर्चा होती. परंतु जालन्यातील कारवाईबाबत दुजोरा मिळू शकला नाही. ही कारवाई म्हणजे छापे नसून, नियमितची तपासणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रारंभी ही कारवाई जीएसटी विभागाची आहे की, काय, अशी चर्चा होती. परंतु नंतर ही कारवाई प्राप्तीकर विभागाचीच असल्याचे समोर आल्याने अनेक व्यापा-यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.
प्रतिष्ठाने बंद : माहिती देण्यास अधिका-यांचा नकार
भोकरदन अणि जाफराबाद येथील सराफा व्यावसायिकांवर तसेच एका कंत्राटदारावर प्राप्तीकर विभागाने गुरुवारी छापे टाकले. परंतु या कारवाईमध्ये नेमके काय आढळून आले, याची माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित अधिका-यांशी संपर्क साधला असता कुठलीच माहिती देण्यास नकार दिला. आमचे काम केवळ कारवाई करणे आहे. माहिती देण्याचे अधिकार आम्हाला नसल्याचे सांगून मुंबई येथील मुख्यालयात संपर्क साधल्यास ती मिळू शकेल, असेही अधिका-यांनी स्पष्ट केल्याने तपशील कळू शकला नाही.