रिफाइंड पामतेलावर प्रतिबंध घातल्याने सर्व प्रकारच्या खाद्य तेलांत तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:03 AM2020-01-13T01:03:06+5:302020-01-13T01:03:22+5:30
केंद्र सरकारने मलेशिया आणि इंडोनिशिया येथून येणाऱ्या रिफाइंड पामतेल आयातीवर बंदी घातल्याने सर्वच खाद्य तेलांच्या किमतीत दोन रुपये लिटरमागे वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र सरकारने मलेशिया आणि इंडोनिशिया येथून येणाऱ्या रिफाइंड पामतेल आयातीवर बंदी घातल्याने सर्वच खाद्य तेलांच्या किमतीत दोन रुपये लिटरमागे वाढले आहेत. गहू, ज्वारी, तूर, मूग, मूगदाळ, साबुदाणा, साखर, गूळ, वनस्पती तुपातही तेजी असून, सोने आणि चांदीचे भाव मात्र, अडीच हजाराने घसरले आहेत. सोन्यासह चांदीचे भाव चालू वर्षात प्रथमच घसरले आहेत.
जगातील पामतेल उत्पादनाचे दोन प्रमुख देश आहेत. त्यात इंडोनिशिया आणि मलेशियाचा समावेश आहे. येथे दुष्काळ असल्याने तेथील तेलबियांचे उत्पादन कमी झाल्याचा हा परिणाम आहे. इंधनामध्ये आता ३० टक्के पामतेलापासून उत्पादीत होणारे जैविक इंधनाचे मिश्रण करण्यात येणार असल्याने पामतेलाची विक्री २५ लाख टनांनी वाढण्याची शक्यता आहे. भारत सरकारने देशातील उद्योगांना चालना देण्यासाठी रिफाईंड पामतेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. ही बंदी घालण्यामागे काश्मिरमधील भारताने ३७० कलम हटविणे तसेच नागरिकत्व कायद्याला मलेशियाने केलेला विरोध देखील कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत काम करणाºया विदेश व्यापार महानिर्देशालयाने नोटीफिकेशन काढून, रिफाईंन पामतेल आणि रिफाईंन पामोलिव्हच्या निर्यात धोरणाला पायबंद घातला आहे. यामुळे भविष्यात भारत केवळ क्रूड पामतेलाचीच आयात करणार आहे. हे तेल इंडोनिशयातून आयात होते, त्यामुळे याचा मोठा लाभ इंडोनिशियाला होऊ शकतो. तसेच पामतेलाची मोठ्या प्रमाणावर भारताला निर्यात करणाºया मलेशियाला मात्र नवीन धोरणाचा मोठा फटका बसणार आहे. सरकारच्या या नवीन धोरणामुळे कुठलीच कंपनी आता थेट रिफार्इंड पामतेलाची आयात करू शकणार नाही. या सरकारच्या धोरणाचे खाद्य तेल उत्पादकांनी स्वागत केले आहे. या सरकारच्या धोरणामुळे खाद्य तेल उत्पादकांसह शेतकऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे.
सोया तेल ९९५ ते १०००, कॉटन ९६० ते ९७०, पामतेल ९६० ते ९७० प्रति दहा किलो हे भाव आहेत. गव्हात २०० रूपयांची तेजी असून, दर २४०० ते २८०० प्रतिक्विंटल, ज्वारीची रोजची आवक ५०० पोती आहेत तीन हजार ५०० ते चार हजार २०० रूपये प्रतिक्विंटल तूरीची आवक दहा हजार पोती असून, त्यात २०० रूपयांची वाढ झाली असून, ४४०० ते ५ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल, सोयाबीनची आवक आजही कायम असून, ५०० पोती आहे. चार हजार १०० ते चार हजार २०० एवढी आहे.
साखरेच्या दरात ५० ते १०० रुपयांची वाढ
मूगदाळचा भाव ९ हजार ७०० रूपये आहे. मकरसंक्रांती निमित्त मध्यप्रदेशातील गोटेगाव येथून गुळाची आवक होत आहे. भाव तीन हजार ३०० ते तीन ५००, साखरेच्या दरात ५० ते १०० रूपयांची वाढ प्रतिक्विंटल भाव, तीन हजार ४५० ते तीन हजार ६५० प्रतिक्विंटल दर आहेत.
सोन्याच्या दरात प्रतितोळा २ हजार ५०० ची मंदी आली आहे. ४० हजार ४०० रूपये प्रतितोळा तर चांदीत दोन हजार रूपयांची घसरण झाली असून, भाव ४८ हजार प्रतिकिलो आहेत.