सावरगाव, सोनदेव येथील शेतमजूर कुटुंबावर आस्मानी संकटाचा घाला; दोन्ही गावावर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:26 AM2019-10-07T00:26:07+5:302019-10-07T00:26:57+5:30
शेतमजुरांनी पावसापासून बचावासाठी झाडाचा आधार घेतला. मात्र, विजेच्या रूपात आस्मानी संकट कोसळले आणि सावरगाव भागडे, सेवली येथील तिघा शेतमजुरांचा मृत्यू झाला.
सुभाष शेटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवली : शेतातील सोयाबीनची कापणी सुरू असताना अचानक विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला. शेतमजुरांनी पावसापासून बचावासाठी झाडाचा आधार घेतला. मात्र, विजेच्या रूपात आस्मानी संकट कोसळले आणि सावरगाव भागडे, सेवली येथील तिघा शेतमजुरांचा मृत्यू झाला. या घटनेने दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे.
गयाबाई गजानन नाईकनवरे (३८ रा. सावरगाव भागडे), मंदाबाई नागोराव चाफले (४३), संदीप शंकर पवार (३५ दोघे रा. सेवली ता. जि. जालना) अशी मयतांची नावे आहेत. नाईकनवरे यांच्या शेतात रविवारी दुपारी ही घटना घडली. दुष्काळामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे शेतमजूर मिळेल तेथे कामाला जाऊन मजुरी करीत होते. मात्र, रविवारी नियतीने घाला घातला आणि कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचे प्राण गेले. सावरगाव भागडे येथील गयाबाई नाईकनवरे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तर संदीप पवार यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, वडील असा परिवार आहे. पवार यांचा मुलगा मंगेशही या घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर मयत मंदाबाई चाफले यांच्या पश्चात दोन मुलं आहेत.
घटनेनंतर सेवली प्राथमिक आरोग्य केंद्रात मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, सेवली येथील मयत मंदाबाई चाफले यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, तालुक्यातील माळ सोनदेव शिवारातही वीज पडली. या घटनेत मंगल बद्रीनाथ पालवे (२३), शबानाबी शेख गुलाब (३०) व सुहाना शेख (१६) या तीन महिला मजूर जखमी झाल्या. मंगल पालवे, शबानाबी शेख यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर सुहाना शेख यांना उपचारासाठी सिंदखेडराजा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा रूग्णालयात उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी दिली.