बोगस शौचालयांची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:59 AM2019-02-22T00:59:01+5:302019-02-22T00:59:36+5:30
घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शौचालयांची बोगस कामे झाली असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे प्राप्त झाल्या आहे. या बोगस कामाची चौकशी केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शौचालयांची बोगस कामे झाली असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे प्राप्त झाल्या आहे. या बोगस कामाची चौकशी केली जाणार असून, यासाठी जिल्हास्तरावरुन समितीची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली.
घनसावंगी तालुक्यात पायाभूत सर्वेक्षण २०१२ नुसार वैयक्तीक शौचालयाची कामे करण्यात आली. परंतु, बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये कामे निकृष्ट झाल्याच्या ९ ते १० तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाकडे प्राप्त झालेल्या आहे. काही ठिकाणी शौचालयाचे काम न करताच रक्कम काढण्यात आलेली आहे. तर ग्रामपंचायतीने पायाभूत सर्वेक्षणा बाहेरील अपात्र लाभार्थ्यांना लाभ दिल्याच्या तक्रारीही प्राप्त झालेल्या आहे. या तक्रारीची दखल घेऊन याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हास्तवरुन समितीची नियुक्ती केली असून, पाच जणांची ही समिती महिन्याभरात हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्याकडे सादर करणार आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालातील निष्कर्षाच्या अनुषंगाने अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाल्यास नियमानुसार दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही बोगस शौचालयाचा मुद्दा गाजला होता. सदस्य जयमंगल जाधव यांनी घनसावंगी तालुक्यातील प्रत्येक गावांत शौचालयांचे काम निकृष्ट झाले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले. तालुक्यातील बोरगावची रीतसर तक्रार ही आली होती.
घनसावंगी तालुक्यात शौचालयांची कामे निकृष्ट दर्जेचे झाले असल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहे. या तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही जिल्हास्तरावरुन समिती नेमली आहे. ही समिती महिन्याभरात अहवाल देणार आहे.
- निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी