देऊळगाव राजा : येथील नगरपालिकेमार्फत होत असलेल्या विविध विकासकामात व विविध कल्याणकारी योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. नगर परिषदेच्या सन २०१४ ते १८ या कालावधीतील लेखा परीक्षण झाले असून, सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षक बुलढाणा यांनी केलेल्या लेखापरीक्षण अहवालावरून अनियमितता स्पष्ट होत आहे.
नगर परिषदेतील पदाधिकारी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी २०१९-२० या वर्षात तरतूद नसताना नियमबाह्य खाजगी वाहने भाड्याने लावून पालिकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता केली आहे. तसेच विविध विकासकामांच्या निविदा बोलावण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मर्जीतील कंत्राटदाराला सदर विकासकामे देऊन त्यामध्ये भ्रष्टाचार केल्याचे दिसते. लेखापरीक्षण अहवालात एकीकडे शहराच्या विकासकामावर खर्च करण्यासाठी नगर परिषदेकडे स्वत:चा पर्याप्त निधी नसताना मुख्याधिकारी तसेच अध्यक्ष यांनी नियमबाह्यरित्या लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून उघड झाली आहे. प्रभाग क्रमांक एक मधील नागरी दलित वस्तीमधून करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता बांधकामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. नियमबाह्य प्रमाणात देयके सादर करून नगरपरिषदेतंर्गत लाखो रुपयांची आर्थिक अनियमितता व अपहार करुन मुख्याधिकारी यांनी नियमबाह्य प्रमाणात भक्ता देयके सादर करून नगरपालिकेचे नुकसान केलेले आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांनी नियमबाह्यरित्या मालमत्तेच्या नोंदीकरून कोणत्याही ठोस दस्तावेजाच्याअभावी थातूरमातूर दस्तऐवजावर मालमत्तेच्या नोंदी मूळ मालकाव्यतिरिक्त इतर व्यक्तीच्या नावावर केल्याच्या अनेक घटना आहेत.
चौकशी करून कारवाई करावी
देऊळगाव राजा नगरपालिकेतंर्गत झालेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून, भ्रष्टाचारही झालेला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शासनाने चौकशी समिती नेमून चौकशीअंती दोषींवर कारवाई करावी.
चंद्रकांत खरात, अशासकीय सदस्य,
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद